जायचं होतं पंढरपूरला हेलिकॉप्टर उतरवलं तुळजापुरात; विनापरवानगी ‘लँडिंग’मुळे कंपनीला दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:22 IST2025-07-31T13:19:55+5:302025-07-31T13:22:33+5:30
विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्याने कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड

जायचं होतं पंढरपूरला हेलिकॉप्टर उतरवलं तुळजापुरात; विनापरवानगी ‘लँडिंग’मुळे कंपनीला दंड
तुळजापूर (जि. धाराशिव) : पंढरपूर समजून पायलटने तुळजापुरमध्यचे एक हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. ही घटना ३० जुलै रोजी घडली. येथील हेलिपॅडवर विनापरवाना हेलिकॉप्टर उतरविल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित हेलिकॉप्टर कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. अखेर दंड भरल्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजता हेलिकॉप्टरने येथून उड्डाण भरले.
हैदराबाद येथून पंढरपूरकडे निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी दीड वाजता तुळजापूर येथे पोहोचले. तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घातल्यानंतर त्याने नळदुर्ग रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर विसावा घेतला. दरम्यान, हेलिकॉप्टर उतरण्याची कोणतीही सूचना बांधकाम, महसूल, पोलिस प्रशासनाला नव्हती. त्यामुळे या तिन्ही यंत्रणांची एकच धावपळ उडाली. तुळजापूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय पवार, कर्मचारी माने यांनी हेलिपॅडवर पडताळणी केली. यावेळी हेलिकॉप्टरच्या कॅप्टनने पंढरपूर येथील परवानगी दाखविली. हे तुळजापूर असल्याचे सांगितल्यानंतर त्याने समन्वयकाकडून येथील लोकेशन मिळाल्याचे सांगितले. तोपर्यंत पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय आवळे हेलिपॅडवर दाखल झाले. विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्याने कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड केला. तो भरून घेतल्यानंतर सव्वापाच वाजता हेलिकॉप्टरने येथून उड्डाण भरले.
हा प्रकार गंभीर
तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचे क्षेत्र आहे. येथे भाविकांची कायम वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुधवारचा हा प्रकार गंभीर होता. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना हा प्रकार कळविला आहे.
- आण्णासाहेब मांजरे, पोलिस निरीक्षक, तुळजापूर
विनापरवानगी लँडिंग
संशोधनाच्या कामासाठी हैदराबाद येथून पंढरपूरकडे निघालेले हेलिकॉप्टर त्यांच्यातील समन्वयाअभावी तुळजापुरात उतरवण्यात आले होते. संपूर्ण प्रकाराची खात्री केल्यानंतर विनापरवानगी लँडिंग केल्याने कंपनीस दहा हजार रुपये दंड केला.
-विजय आवाळे, उपकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.