भूम (जि. धाराशिव): तालुक्यातील घाटनांदूर गावाचे माजी सरपंच बजरंग गोवेकर यांच्यासह तीन जणांना एका पवनचक्की कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरूम वाहतुकीचे फोटो काढल्याच्या संशयावरून शुक्रवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना भूम ते ईट मार्गावरील सुकटा ते भवानवाडी फाटा येथे घडली. या हल्ल्यात गोवेकर गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांच्यासोबत असलेले दोन सहकारीही जखमी झाले.
माजी सरपंच बजरंग गोवेकर हे गावातील दोन शेतकऱ्यांसोबत भूम येथील काम आटोपून परत घाटनांदूरकडे जात होते. त्याचवेळी पवनचक्की कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्यासोबतच्या गुंडांनी त्यांना अडवले. "तू मोबाईलमध्ये मुरूम वाहतुकीचे फोटो काढले आहेत काय?" असा प्रश्न विचारून त्यांनी गोवेकर यांना धमकावले. गोवेकर यांनी नकार दिल्यानंतरही सुमारे सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड आणि स्टंपने त्यांना सुमारे २२ मिनिटे मारहाण केली.
या मारहाणीत गोवेकर यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पाठीवर आणि पोटावरही जबर मार लागला आहे. या जीवघेण्या मारहाणीदरम्यान गोवेकर यांच्यासोबत असलेले स्वप्निल गोयकर आणि ज्ञानेश्वर करगळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण झाली. अखेर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर गोवेकर यांची सुटका करण्यात आली. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण भूम तालुक्यात संतापाचे वातावरण असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पाेलीस दवाखान्यात पाेहाेचले...
घटनेची माहिती मिळताच भूम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि बीट अंमलदार उमेश देवकर यांनी तात्काळ बार्शी येथे उपचार घेत असलेल्या बजरंग गोवेकर यांची भेट घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणी अहवाल (एमएलसी) प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले.