पारगावात अतिवृष्टी, उस्मानाबादेत उसंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST2021-09-09T04:39:54+5:302021-09-09T04:39:54+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस हा वाशी तालुक्यात ३९ मिमी इतका ...

पारगावात अतिवृष्टी, उस्मानाबादेत उसंत
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस हा वाशी तालुक्यात ३९ मिमी इतका झाला. त्या पाठोपाठ भूम तालुक्यात २९, कळंब २३, उस्मानाबाद २०, लोहारा २०, परंडा १९, तुळजापूर १३ तर उमरगा तालुक्यात ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने बुधवारी पावसाळ्यातील सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत १०२ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, भूम, वाशी, कळंब तालुक्यातील दमदार पावसामुळे मांजरा व तेरणा प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरू असून, चांगला जलसाठा झाला आहे. उस्मानाबाद शहरासह तेर, ढोकी, येडशी, तडवळा या मोठ्या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या तेर येथील तेरणा धरणातही चांगला पाणीसाठा झाला आहे. बुधवारी प्रकल्प ६० टक्केपेक्षाही जास्त भरला होता. दरम्यान, बुधवारी सकाळपासून उघडीप मिळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसातील पहिले सूर्यदर्शन होऊ शकले. दिवसभर उकाडा जाणवत होता. असे असले तरी सायंकाळी मात्र आकाशात ढगांनी पुन्हा गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
शेतीचे मोठे नुकसान...
जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महसूलच्या प्राथमिक पाहणीत २२६२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तर ८८ हेक्टर्स शेती पुराच्या पाण्यासोबत खरवडून गेली. दरम्यान, अजूनही अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे येथील खरीप पिकांचे पूर्णत: नुकसान झाल्याचे चित्र आहे.