उस्मानाबादेत मुसळधार, ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST2021-07-11T04:22:31+5:302021-07-11T04:22:31+5:30

पावसाअभावी पिके सुकत चाललेल्या उस्मानाबादला शुक्रवारी व शनिवारच्या रात्री मात्र पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात १४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली ...

Heavy rains in Osmanabad, two missing in river floods | उस्मानाबादेत मुसळधार, ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता

उस्मानाबादेत मुसळधार, ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता

पावसाअभावी पिके सुकत चाललेल्या उस्मानाबादला शुक्रवारी व शनिवारच्या रात्री मात्र पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात १४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर परंडा शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यातही जोरदार पावसाची नोंद झाली. विशेषत: पाडोळी मंडळात १०० मिलिमीटरसह अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे पाडोळी परिसरातून वाहणाऱ्या नद्या, ओढे दुथडी भरून वाहत होते. दरम्यान, ओढ्याच्या पुरात उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव व समुद्रवाणी येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघे जण वाहून गेले आहेत. त्यांचा आपत्ती व्यवस्थापनाकडून शोध घेतला जात आहे. शिवाय, पुराचे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या समुद्रवाणी येथील एक गावकरीही पाण्यात वाहून गेला. त्याचाही शोध घेतला जात आहे, तर शुक्रवारी रात्री उशिरा समुद्रवाणी गावातील पुलावरून एक कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे जण होते. दोघे जण पाण्याच्या अंदाज घेण्यासाठी खाली उतरले, तर दोघे कारमध्येच होते. कारमध्ये अडकलेल्या दोघांना गावकऱ्यांनी मानवी साखळी करून पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून

जिल्हाभरात झालेल्या हानीची माहिती घेतली जात आहे.

कोठे, किती झाला पाऊस...

परंडा मंडळात सर्वाधिक १२८ मि.मी. पाऊस झाला आहे, तर परंडा तालुक्यातील सोनारी १००, अनाळा ९२, आसू ७९, जवळा ७६, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ९२, जळकोट ७२, इटकळ ६९, सलगरा ६५, उमरगा मंडळात ९७, मुळज ८९, डाळिंब ७०, लोहारा तालुक्यातील माकणी ८८, लोहारा मंडळात ७१, तर उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी मंडळात १०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Heavy rains in Osmanabad, two missing in river floods