जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी, वीज पडून दाेन जनावरे ठार, पिकांचे अताेनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST2021-09-25T04:35:30+5:302021-09-25T04:35:30+5:30
उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी ...

जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी, वीज पडून दाेन जनावरे ठार, पिकांचे अताेनात नुकसान
उस्मानाबाद -जिल्ह्यात गुरुवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. उस्मानाबादसह कळंब आणि उमरगा या तालुक्यांतील जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. परिणामी पावसामुळे कळंब-ढाेकी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प हाेती. तसेच वीज पडून दाेन म्हशी दगावल्या असून, अनेक भागांतील साेयाबीनसारखे नगदी पीक पाण्याखाली गेले आहे.
दाेन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा सर्वदूर पाऊस झाला. अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपर्यंत पावसाचा जाेर कायम हाेता. जवळपास पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील ढाेकी मंडळात ८५ मिमी, तेर ७३.३ मिमी, कळंब तालुक्यातील शिराढाेणमध्ये ७१.८ मिमी, उमरगा तालुक्यातील उमरगा मंडळामध्ये ७०.८ मिमी आणि मुळज मंडळामध्ये ६६.३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या साेयाबीन पिकाचे अताेनात नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कळंब ते ढोकी या राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाणी आल्याने आवाड शिरपुरा गावचा संपर्क तुटला हाेता. सातेफळ तसेच डिकसळ येथे वीज पडून प्रत्येकी एक अशा दाेन म्हशी दगावल्या. दरम्यान, मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे यापूर्वीच ०.५० मीटरने उचलण्यात आले हाेते. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या धाे-धाे पावसामुळे पाण्याची आवक वाढली. परिणामी शुक्रवारी सकाळच्या सुमारास संबंधित सहा दरवाजे आणखी २.७५ मीटर उचलण्यात आले. त्यामुळे मांजरा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने हे पाणी नदीकाठच्या शेतशिवरात घुसले. परिणामी साेयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली गेली. वाढता जलस्तर लक्षात घेतला, पाेलीस पाटलांना अलर्ट राहण्याबाबत आदेशित केले. तसेच सर्व तलाठ्यांनाही सज्जाच्या ठिकाणी पाचारण केले हाेते. माेहा येथे एकाच्या घराची भिंत काेसळली. सुदैवाने या घटनेत काेणतीही जीवितहानी झाली नाही. तुळजापूर तालुक्यातील सांगवी-माळुंब्रा हा तलावही ओव्हरफ्लाे झाला. त्यामुळे सांगवी गावानजीकचा पूल पाण्याखाली गेल्याने गुरुवारी रात्री अकरा वाजल्यापासून गावाचा संपर्क तुटला हाेता. साेबतच उमरगा, उस्मानाबादेतही जाेरदार पाऊस झाला. उस्मानाबाद शहरातून वाहणारी भाेगावती नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. या पावसामुळे लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले असले तरी शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास मात्र पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज व्यक्त हाेत आहे.