लक्ष्मीसाठी गावी आले अन् नियतीने डाव साधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:17+5:302021-09-16T04:40:17+5:30

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : महालक्ष्मी सणानिमित्त गावाकडे आलेल्या सिंदफळ येथील ३३ वर्षीय शिक्षकास वाहनाने मागून ठोकरल्याने जागीच मृत्यू झाल्याची ...

He came to the village for Lakshmi | लक्ष्मीसाठी गावी आले अन् नियतीने डाव साधला

लक्ष्मीसाठी गावी आले अन् नियतीने डाव साधला

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : महालक्ष्मी सणानिमित्त गावाकडे आलेल्या सिंदफळ येथील ३३ वर्षीय शिक्षकास वाहनाने मागून ठोकरल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री सोलापूर-धुळे महामार्गावर घडली. याच घटनेत त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेला त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सुधाकर मच्छिंद्र कांबळे हे अणदूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महालक्ष्मीच्या सणासाठी ते गावी आले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ते व त्यांचा चुलत भाऊ महेश बाळू कांबळे हे दुचाकीवरून तुळजापूर-उस्मानाबाद रोडवरील बोरी गावानजीक असलेल्या मोठ्या भावाच्या पंक्चर दुकानात गेले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सुधाकर व महेश कांबळे हे दोघेही दुचाकीने गावाकडे परतण्यासाठी निघाले होते. सोलापूर-धुळे महामार्गावर ते दुकानावरून वळताच, उस्मानाबादमार्गे येणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली. या घटनेत शिक्षक सुधाकर कांबळे हे जागीच ठार झाले, तर महेश कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षक सुधाकर कांबळे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून, २०१० मध्ये तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. ते सध्या अणदूरच्या प्राथमिक कन्या शाळेत कार्यरत होते. त्यांच्यापश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: He came to the village for Lakshmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.