पुण्याहून आले अन् सत्ता केली काबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST2021-01-22T04:29:39+5:302021-01-22T04:29:39+5:30
लाखनगावात प्रस्थापितांना धक्का पारगाव : ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती बिनविरोध काढण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांसमोर मांडला. परंतु, गावपुढाऱ्यांनी त्यास प्रतिसाद ...

पुण्याहून आले अन् सत्ता केली काबीज
लाखनगावात प्रस्थापितांना धक्का
पारगाव : ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर ती बिनविरोध काढण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांसमोर मांडला. परंतु, गावपुढाऱ्यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने अखेर समविचारी लोकांना एकत्रित करीत स्वत:चा पॅनल निर्माण करून ग्रामपंचायत ताब्यात घेण्याची किमया लाखनगाव येथील लक्ष्मणराव लाखे यांनी साधली आहे.
वाशी तालुक्यातील लाखनगाव येथील लक्ष्मणराव माणिकराव लाखे हे उदरनिर्वाहासाठी पुणे येथे गेले होते. तेथे जमेल ते काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाची घडी बसविली. मात्र, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागल्यानंतर ते कुटुंबासह गावी परत आले. त्यांना पूर्वीपासून अध्यात्माची आवड असल्याने येथे आल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून ग्रामदैवत लाखेश्वर मंदिराचे बांधकामही केले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यावेळी लाखे यांनी सत्ताधाऱ्यांसमोर गावातील समस्या मांडत निवडणुकीचा अनावश्यक खर्च टाळून ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांचा हा विचार कुणालाच पटला नाही. त्यामुळे येथे निवडणूक लागली.
दरम्यान, ही बाब जिव्हारी लागल्यामुळे लाखे यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या तरुणांना सोबत घेत लाखेश्वर ग्रामविकास पॅनल स्थापन करून उमेदवार उभारण्याचा निर्णय घेतला. शिवाय, स्वत: दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लाखे यांनी या निवडणुकीत सात जागांवर आपल्या पॅनलचे उमेदवार निवडून आणले. शिवाय, दोन जागांवर स्वत: विजयी होऊन ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली. विजयी उमेदवारांमध्ये लाखे यांच्यासह मनोज ढेपे, ताई सुरवसे, आश्विनी गिरी, सुरेखा तवले, मेघा लाखे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत लाखनगाव महाविकास आघाडीचे विकास ढेपे व रामदास वाघमारे हे दोनच उमेदवार विजयी झाले.
चौकट.........
यांचे मिळाले सहकार्य
लक्ष्मण लाखे यांना या निवडणुकीत पारगावचे कॉ. पंकज चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली संतोष लाखे, शिवाजी गिरी, सुभाष मोरे, गावातील प्रभाकर माने, संजय सुरवसे, सुभाष मोरे, बन्सी लाखे, श्रीराम लाखे, बाबासाहेब लाखे, सुरेश लाखे, अच्युतराव ढेपे, संदीप लाखे, नानासाहेब ढेपे, विलास लाखे, विष्णू वाघमारे, पुरुषोत्तम तवले, चक्रधर लाखे, दत्ता लाखे आदींनी सहकार्य केले.
चौकट.........
गावात समशानभूमी, मुख्य रस्ता, पाणीप्रश्न, नाल्या यासह सार्वजनिक वाचनालय व इतर प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आम्ही एका विचाराने ही निवडणूक लढविली आणि सत्ता मिळविली. येत्या काळात हे प्रश्न मार्गी लावण्यासोबतच गावकऱ्यांच्या सहकार्याने इतर विकासकामेही केली जातील.
- लक्ष्मणराव लाखे, पॅनलप्रमुख