तासिका तत्वावरील गुरुजी शेतमजुरीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:39 IST2021-09-08T04:39:06+5:302021-09-08T04:39:06+5:30
उमरगा : सध्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले उच्च शिक्षित युवक, ...

तासिका तत्वावरील गुरुजी शेतमजुरीवर !
उमरगा : सध्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनुदानाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले उच्च शिक्षित युवक, युवतींना तासिका तत्वावर काम मिळत होते. परंतु, कोरोनाने तेही हिरावले असून, आता अनेकजण आपला पारंपरिक व्यवसाय किंवा अन्य ठिकाणी नोकरी करून प्रसंगी शेतमजुरीवर जाऊन उदरनिर्वाह भागवित आहेत. राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
किती दिवस जगायचे असे?
आई वडील आमच्या शिक्षणावर आयुष्यभर काबाडकष्ट करून खर्च करतात. त्याप्रमाणे आम्हीही कष्ट करतो. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे कित्येक वर्ष तासिका तत्वावर काम करावे लागते. तोही पगार वेळेवर मिळत नाही. कोरोना महामारीच्या या काळात तरी शासनाने पुढाकार घेऊन तासिका तत्वावरील प्राध्यापकांना न्याय द्यावा.
- प्रा. के. पुर्णिमा, उमरगा
अनेक वर्षापासून प्राध्यापक भरती नाही. अतिरिक्त पद्भार हा तासिका तत्वावरील प्राध्यापकाला अल्प मानधनावर सांभाळावा लागतो. अनेकांनी हे क्षेत्र सोडून उदरनिर्वाहासाठी अन्य व्यवसाय सुरू केला आहे. आतातरी शासनाने आम्हाला गुरू म्हणून मुख्य प्रवाहात आणून सन्मान द्यावा.
- डॉ. वैभव माने, उमरगा.
हजारो रिक्त जागा असूनही शासनाच्या धोरणामुळे त्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. मानधन अतिशय तुटपुंजे मिळते. त्यामध्ये धड उदरनिर्वाह देखील होत नाही. शैक्षणिक पात्रता असूनही मजुरीच्या कामावर जाण्याची वेळ आली आहे.
- प्रा बालाजी कांबळे, उमरगा
सेट नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
प्राध्यापक व्हावे म्हणून राज्य सरकारने नेट आणि सेट पात्रता परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. या परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्याचा उपयोग नाही.
सरकारने एक धोरण ठरवून किमान ३० हजार रुपये महिना सर्व तासिका तत्त्वावरील उमेदवारांना देण्याची गरज आहे.
१० वर्षापासून लटकला प्रश्न -
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसह सहायक प्राध्यापकांच्या मुद्यावरून सरकार अडचणीत सापडले आहे. आर्थिक तरतूद आणि वेगवेगळे तांत्रिक निकष यामुळे आमचे प्रश्न निकाली निघत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
कधीतरी कायमस्वरूपी प्राध्यापक पदावर रुजू करून घेतील, या आशेवर दहा-दहा वर्षांपासून तासिका तत्त्वावर काम करतात. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाला महाविद्यालयात कवडीचीही किंमत नसते.