कृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:42+5:302021-03-27T04:33:42+5:30

लोहारा : कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोहारा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. ...

Guidance from the Department of Agriculture on the dam | कृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन

कृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन

लोहारा : कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लोहारा तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतातील खरबुजाची खरेदीही केली. यावेळी तालुक्यातील कृषी कामासंदर्भात मासिक चर्चासत्र ही घेण्यात आले आहे.

या प्रक्षेत्र भेटीमध्ये गुरुवारी लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील शेतकरी महेश डोंगरे यांनी सुरू केलेल्या मशरूम प्रकल्पाची पाहणी करून त्यांना विपणन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हा प्रकल्प करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अवजारे बँकेची पाहणी करून शेतकरी गटातील शेतकऱ्यांना अवजारे बँक वापर आणि त्याचे अभिलेख ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. जेवळी येथे बसवराज वलदोडे यांच्या शेतावर सीताफळ लागवड व त्याची निगा यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोघा (बु) येथील भूजंग महादेव साबळे यांच्या फळबागेची पाहणी करून पेरु लागवड व त्याची छाटणी कशी करावी ? याविषयी कृषी विज्ञान केंद्राचे गणेश मंडलिक यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.

या अधिकाऱ्यांनी शिवाजी जाधव यांच्या फुल शेतीस भेट दिली. यावेळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या काटेकोरपणे वापर करण्यात यावा यासाठी पोखरा योजनेंतर्गत शेततळे, अस्तरीकरण व ठिबक सिंचन पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले. तसेच हिप्परगा (रवा) येथील विजयकुमार कुलकर्णी यांच्या आंबा बागेची पाहणी करून कीड व रोग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्षेत्र भेटीनंतर लोहारा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मासिक चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील पीक परिस्थिती व त्यावरील उपाययोजना या संदर्भात कृषी विद्यावेत्ता वसंत सूर्यवंशी व हवामानतज्ज्ञ एस. एल. हरवाडीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, बजरंग मंगरूळकर,तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, ज्ञानेश्वर जाधव, सुनील जाधव, नामदेव गायकवाड, महारुद्र मोरे, बी. बी. जाधव, संतोष कोयले, संजय गायकवाड व तालुक्यातील कृषी सहाय्यक उपस्थित होते.

कृषी अधिकाऱ्यांनी केली १३० किलो खरबुजाची खरेदी

विकेल ते पिकेल या संकल्पनेंतर्गत नागराळ येथील गणेश गोरे यांच्या भाजीपाला स्टॉलला छत्री भेट देऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत १३० किलो खरबूज खरेदी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपला माल विक्री करण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज भासली नाही. तर व्यापाऱ्याची होत असलेली मध्यस्थी यामुळे टाळण्यासही मदत झाल्याने शेतकऱ्यांना देखील याचा आर्थिक फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट शेतकऱ्यांकडूनच माल विकत घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: Guidance from the Department of Agriculture on the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.