वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक, व्यापाऱ्यांत पसरली दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST2021-09-09T04:39:56+5:302021-09-09T04:39:56+5:30
वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या ...

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक, व्यापाऱ्यांत पसरली दहशत
वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेने बुधवारी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
शहरामध्ये मागील एक वर्षाहून अधिक कालावधीपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. ज्यामध्ये घरफोडी करून शस्त्राने नागरिकांना जखमी करण्याबरोबरच मुख्य बाजारपेठेमधील व्यावसायिकांची दुकाने फोडली जात आहेत. यातच मागील वर्षभरात एकाही घटनेचा तपास लागलेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. रविवारीदेखील मुख्य बाजारपेठेचा हिस्सा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किराणा दुकान फोडून हजारो रुपयांचे खाद्यतेल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे नगरपंचायतीने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रस्त्यावरील तसेच नागरी वस्त्यांमधील सातत्याने बंद राहत असलेले पथदिवे तत्काळ बदलून ते कायम चालू राहतील अशी व्यवस्था करावी. शहरातील मुख्य रस्ते, चोररस्ते, मुख्य बाजारपेठ चौक या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.
वाशी हे तालुक्याचे ठिकाण असूनदेखील शहरात येण्यासाठी एकही रस्ता सुस्थितीत नाही. यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दळणवळण होऊ शकत नाही. शिवाय, एस.टी.सारखी शासकीय वाहनेदेखील शहरात येण्याचे टाळतात. त्यामुळे आपल्या अधिकारातून सर्व रस्तेदुरुस्ती करावी, अशी मागणी नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागील घटनांचा तपास लावून भविष्यातील घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व नगरपंचायतीच्या वतीने अधीक्षक गोपीनाथ घुले यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वाशी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, उपाध्यक्ष सूर्यकांत मोळवणे, सचिव ॲड. प्रवीण पवार, व्यापारी बंडू भाळवणे, आदी उपस्थित होते. निवेदनावर खालेक पटवेकर, बाळासाहेब उंदरे, शिवशंकर चौधरी, सुंदर नन्नवरे, अशोक टेकाळे, सतीश जगताप, रमेश वीर, गुरुलिंग नगरे, शिवशंकर होळकर, राजेंद्र शेटे, अमित येवारे, अभिमान माने, मनीष कोळी यांच्यासह शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.