जिल्ह्यात भूजल साक्षरतेचा चित्ररथ झाला दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST2021-08-25T04:38:02+5:302021-08-25T04:38:02+5:30

उस्मानाबाद : अटल भूजल अर्थात अटल जल योजनेंतर्गत राज्यातील भूजल क्षेत्रातील सुधारणांच्या अनुषंगाने भूजल साक्षरता वाढविण्यासाठी चित्ररथ जिल्ह्यात दाखल ...

Groundwater literacy has been introduced in the district | जिल्ह्यात भूजल साक्षरतेचा चित्ररथ झाला दाखल

जिल्ह्यात भूजल साक्षरतेचा चित्ररथ झाला दाखल

उस्मानाबाद : अटल भूजल अर्थात अटल जल योजनेंतर्गत राज्यातील भूजल क्षेत्रातील सुधारणांच्या अनुषंगाने भूजल साक्षरता वाढविण्यासाठी चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असून, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून या चित्ररथाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.

राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भूजलाची गुणवत्ता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राज्यातील १३ जिल्ह्यातील ७३ पाणलोट क्षेत्रातील १३३९ ग्रामपंचायतींमधील १४४३ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्या शासन निर्णयानुसार योजनेचे नियोजन, अटी, शर्ती, योजनांची आखणी, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी बाबीची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. या योजनांतर्गत जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुका ५० व उमरगा तालुक्यातील ५ अशा एकूण ५५ गावांचा समावेश करण्यात आहे.

या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षणचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यामार्फत भूजल साक्षरता चित्ररथाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. या चित्ररथाचे सोलापूर जिल्ह्यातून तामलवाडी येथे सरपंच गवळी आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करुन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दीपकनगर तांडा (ता.उस्मानाबाद) येथे चित्ररथ फिरविण्यात आला.

चित्ररथाच्या आगमनावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता (भाप्रसे) यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचे संचलन केले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती टेकाळे, सहायक भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता डी. आर. देवकर, भूवैज्ञानिक शुभांगी गुरवे, मनिषा डोंगरे, तसेच पाणी व स्वच्छता कक्षातील गादगे, मिसाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Groundwater literacy has been introduced in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.