ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बनली धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:43+5:302021-08-20T04:37:43+5:30

माडज : उमरगा तालुक्यातील माडज येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, या कार्यालयात बसून काम करणे जिकिरीचे व ...

The Gram Panchayat office building became dangerous | ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बनली धोकेदायक

ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बनली धोकेदायक

माडज : उमरगा तालुक्यातील माडज येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, या कार्यालयात बसून काम करणे जिकिरीचे व धोकेदायक बनले आहे. ही इमारत केव्हाही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतचा कारभार मोकळ्या जागेत बसून केला जात आहे.

तालुक्यातील माडज येथील ग्रामपंचायत कार्यालयाची ही इमारत चाळीस वर्षांपूर्वीची असून, सद्य:स्थितीत ती जीर्ण झाली आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी करूनही मागणी मान्य होत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. इमारतीचा गिलावा, छत गळून पडत असून, भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये बसून कामकाज करणे धोक्याचे बनले आहे. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव अनेक वर्षापूर्वी शासनाकडे दिला आहे. तसेच शासनाकडे ३ लाख ६० हजार रुपये लोकवाटाही भरण्यात आला आहे. यालाही आता पाच-सहा वर्ष झाली आहेत. परंतु, प्रशासन स्तरावर ग्रामपंचायत इमारत बांधण्याबाबतीत उदासीन भूमिका घेण्यात येत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून केला जात आहे.

दरम्यान, सध्या इमारतीबाहेरील मोकळ्या जागेत खुर्ची टेबल टाकून ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. सरपंच विजय कुमार बाचने व उपसरपंच नरेंद्र माने यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, नागरिक येथेच आपले काम आटोपत आहेत. १९८२ साली बांधकाम झालेली ही इमारत आता जीर्ण झाली असून, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने तत्काळ ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Web Title: The Gram Panchayat office building became dangerous