' तहसीलदार हल्ला प्रकरणी आरोपींना अटक करा'; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उस्मानाबादेत मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 19:30 IST2019-12-18T19:27:09+5:302019-12-18T19:30:55+5:30
वैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेले परंडा तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जखमी केले.

' तहसीलदार हल्ला प्रकरणी आरोपींना अटक करा'; शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उस्मानाबादेत मूकमोर्चा
उस्मानाबाद : परंडा येथील तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावर वाळूमाफियाने केलेल्या प्राणघात हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून जिल्हा कचेरीवर मूकमोर्चा काढला़
१४ डिसेंबर रोजी परंडा शहरापासून काही अंतरावर असलेल्या भोत्रा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेले परंडा तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जखमी केल्याची घटना घडली़ सदरील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले़
मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते़ मात्र, आरोपी अद्यापही मोकाटच असल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, प्रशासकीय इमारत व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरातील प्रशासकीय इमारत ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला़ मोर्चामध्ये जिल्हातील तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल कर्मचाऱ्यांसह अन्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता़