पंधरा दिवसापासून घाटपिंप्री अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:31+5:302021-09-26T04:35:31+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न ...

पंधरा दिवसापासून घाटपिंप्री अंधारात
पारगाव : वाशी तालुक्यातील घाटपिंप्री गावात गेल्या पंधरा दिवसापासून वीज नसल्याने ग्रामस्थांना अंधारात चाचपडावे लागत आहे. विजेअभावी गावाचा पाणीप्रश्न देखील भीषण बनला असून, हातपंपावरील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या पश्चिमेला घाटपिंप्री गाव आहे. या गावाला भूम तालुक्यातील ईट येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या गावासाठी २५ केव्हीएचे तीन ड्रम आहेत. हे तिन्ही ड्रम ४ सप्टेंबर रोजी जळाले. यानंतर पुढच्या पाच दिवसात ड्रम बसवून वीज पुरवठा जोडण्यात आला. मात्र, २१ सप्टेंबर रोजी पुन्हा हे ड्रम जळल्याने गाव पुन्हा अंधारात चाचपडत आहे.
गावात २७० वीज ग्राहक आहेत. यातील नियमित बिल भरणाऱ्यांची संख्या दोनशे आहे. याउलट अनधिकृत पणे वीज वापरणाऱ्याची संख्या याहून दुप्पट आहे. त्यामुळे येथील ड्रम सतत्याने जळत आहेत. परिणामी नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांना याचा फटका बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यासंदर्भात भूमचे वरिष्ठ अभियंता प्रशांत शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ईट येथील कनिष्ठ अभियंता पी. पी. बरडे यांचा फोन लागला नाही. याठिकाणी लाईनमन म्हणून काम करणारे नवनाथ आणेराव यांनी येत्या सोमवारी या ठिकाणी ड्रम बसवले जातील, असे सांगितले.
कोट..........
गावातील वीज प्रश्नाबाबत वारंवार अधिकाऱ्यांना बोललो. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. विजेचा होणारा बिघाड हा अनधिकृत वीज जोडणीमुळे होत असून, प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र, वीज वितरण कंपनी आशा लोकांना पाठीशी घालून नियमित वीज बिल भरणा करणाऱ्यांंना वेठीस धरत आहे.
- सुजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य
गावाला वीज पुरवठा नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. सध्या हात पंपावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. काही जणांनी शेतातून घराकडे पाणी आणत आहेत. अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने तात्काळ विजेचा प्रश्न सोडवावा, नाहीतर ग्रामस्थांना घेऊन ग्रामपंचायत आंदोलन करेल.
- किरण सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य
गावात चोरून वीज वापरणाऱ्यांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज चोरीमुळे सातत्याने काही न काही बिघाड झालेला असतो. गावात आठ दिवसापासून वीज नाही. महावितरणही लक्ष देत नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्यांची गोची झालेली आहे.
- जयचंद्र सातपुते, वीज ग्राहक