जिद्दीच्या बळावर पूर्ण केले सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:26+5:302021-09-17T04:39:26+5:30
जिद्दीच्या बळावर पूर्ण केले सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न पूर्ण कळंब : चारवेळा प्रयत्न व्यर्थ ठरले तरी मैदानात टिकून राहून ...

जिद्दीच्या बळावर पूर्ण केले सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न
जिद्दीच्या बळावर पूर्ण केले सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न पूर्ण
कळंब : चारवेळा प्रयत्न व्यर्थ ठरले तरी मैदानात टिकून राहून जिद्द, चिकाटीच्या बळावर 'गौरी गणपती'च्या सणादिवशीच त्या ‘गौरी’नेही सनदी लेखापाल होण्याचे स्वप्न वास्तवात आणले. ‘आकांशापुढती गगन ठेंगणे’ याचा प्रत्यय देणारी ही यशकथा आहे कळंबच्या गौरी देशमुख यांची.
कळंब येथील नगर पालिकेत सेवारत असलेले अविनाश यशवंतराव देशमुख तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या पाचही मुलींच्या पंखांना कायम बळ देण्याचे काम केले. यापैकीच एक गौरी. या गौरीने कळंबच्या विद्याभवन शाळेत दहावीला ९१ टक्के गुण मिळवूनही केवळ वडिलांवर खर्चाचा अधिक भार पडू नये यासाठी वाणिज्य शाखा निवडली. यातच एका शेजारच्यांच्या नातेवाईक मुलीने ‘सीए’ केल्याचे पाहून गौरीनेही त्याच मार्गाने जायचा असा निश्चय केला. लातुरात दाखल होत १२ वीमध्ये ९२ टक्के गुण घेतले. शिवाय तिथे सीएच्या सीपीटीची तयारी केली. याठिकाणी सनदी लेखापाल होण्याच्या दृष्टीने तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. यानंतर महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेचा ध्यास मनी घेऊन पुणे गाठले अन् ‘बी.कॉम.’ करत करत सीएची जोरदार तयारी केली. काही फर्मकडे अनुभवाचे धडे तर संस्थांमध्ये मार्गदर्शन घेतले. यानंतर झालेल्या परीक्षेला ती आत्मविश्वासाने सामोरी गेली अन् सोमवारी गौरी गणपतीच्या सणादिवशीच लागलेल्या निकालात गौरीने घवघवीत यश मिळवत सनदी लेखापाल म्हणून यश मिळवले.
चौकट....
चार वेळा अपयश, तरी सातत्य कायम....
गौरी देशमुख यांच्या घरात कोणी या क्षेत्रात नव्हते. तशी परिस्थिती ही भक्कम नव्हती. मात्र, नातेवाईक, स्नेहीजनांचे मोठे बळ होते. यातूनच गौरीने सनदी लेखापाल बनायचे असा चंग बांधला. यात चारवेळा यशाने हुलकावण्या दिल्या, तरी प्रयत्नातील सातत्य सोडले नाही. शेवटी गौरीने गौरी गणपतीच्या सणादिवशीच आपल्या कुटुंबीयांना सनदी लेखापाल पदवीला गवसणी घालत गोड भेट दिली.
स्वप्न पहा, त्यासाठी पाऊल टाका...
यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना गौरी देशमुख म्हणाली, विशेषतः मुलींनी आपल्या करिअर संदर्भात स्वप्नं पाहिली पाहिजेत. मग यासाठी केवळ एक पाऊल उचलणे गरजेचे आहे. पुढे मार्ग, मार्गदर्शन आपोआप मिळत राहील. फक्त पाऊल टाकायचा निर्णय घेण्यात कमी पडू नये.