चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट, अर्ज दाखल करण्यासाठीचा हेलपाटा व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:43+5:302021-09-02T05:09:43+5:30
काय आहे मेसेज... ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाने मृत्युमुखी पडला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात ...

चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट, अर्ज दाखल करण्यासाठीचा हेलपाटा व्यर्थ
काय आहे मेसेज...
ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाने मृत्युमुखी पडला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज व सोबत दिलेली कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात सादर करावेत.
११५ जणांनी केले होते अर्ज...
सोशल मीडियात फिरत असलेला बनावट मेसेज खरा समजून अनेकांनी वेळ व्यर्थ घालवला. मेसेजमध्ये नमूद अर्ज भरून त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठी बराच वेळ खर्ची घातला. मेहनत घेतली. संपूर्ण कागदपत्रे एकत्र करून जिल्ह्याला खेटे घातले. असे सुमारे ११५ जणांनी अर्ज केले होते. अर्ज घेऊन जाणाऱ्या अनेकांना अधिकाऱ्यांनी तेथेच अशी कुठलीही योजना नसल्याचे सांगितले. तरीही अर्ज ठेवून घेण्यासाठी नागरिक आग्रही दिसून आले.
ते अर्ज काढले निकाली...
बनावट मेसेजचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मदत मिळवून घेण्यासाठी ११५ जणांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज ठेवून घेण्यात आले. यानंतर शासनाची कोणतीही अशी योजना नसल्यामुळे ते निकाली काढून अर्ज करणाऱ्या व्यक्तींना अशी योजना नसल्याने मदत मिळणे शक्य नसल्याचे कळवून टाकण्यात आले.
अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही...
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नाहीत. यासंदर्भात सोशल मीडियातून फिरणारा संदेश चुकीचा आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, कार्यालयांमध्ये व्यर्थ हेलपाटे घालू नयेत.
-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी