२२ ग्रामपंचायतींची सूत्रे महिलांच्या हाती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:23+5:302021-01-23T04:33:23+5:30
वाशी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण साेडत शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली. ...

२२ ग्रामपंचायतींची सूत्रे महिलांच्या हाती...
वाशी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण साेडत शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली. लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या असता, २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या खुर्चीत महिला विजराजमान हाेणार आहेत.
वाशी तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सरपंचपदाची आरक्षण साेडत प्रक्रियेला सुरुवात झाली. ४२ पैकी ३४ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. तर उर्वरित आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २०२२-२३ मध्ये हाेणार आहेत. या सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारासाठी सात ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. यात जवळका, रुई/लोणखस, पार्डी व कन्हेरी ही गावे महिलासाठी आरक्षित, तर झिन्नर, सारोळा-वाशी व पांगरी या ग्रामपंचायती अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण संवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी दाेन ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहे. यात खामकरवाडी महिलेसाठी, तर पिंपळवाडी- कमळेश्वरी सर्वसाधारणसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग सवंर्गासाठी ११ आरक्षित आहेत. यात महिलांसाठी तांदूळवाडी, खानापूर, सारोळा-मांडवा, गोलेगाव, फक्राबाद, हातोला, तर वडजी, पारगाव, सटवाईवाडी, डोंगरेवाडी व घोडकी ही गावे सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत. बहुमत मिळालेल्या पॅनलमधील काेणाला संधी मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे. आरक्षण साेडतीस तहसीलदार नरसिंग जाधव, निवडणूक नायब तहसीलदार भालचंद्र यादव, नायब तहसीलदार सुजाता हंकारे, स्नेहलता पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित हाेते.
चाैकट...
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी २२ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये महिलांसाठी गोजवडा, विजोरा, कडकनाथवाडी, मसोबाचीवाडी, पारा, पिंपळगाव-लिंगी, सोनारवाडी, सोनेगाव, सरमकुंडी, लाखनगाव व घाटपिंपरीचा समावेश आहे़ सर्वसाधारण प्रवर्गासाठी बावी, दसमेगाव, इंदापूर, मांडवा, पिंपळगाव (को.), पिंपळवाडी, दहिफळ/शेलगाव, सेलू, शेंडी, नांदगाव, तेरखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पिंपळवाडी, गोजवडा, मसोबाचीवाडी, सोनेगाव, पारा, फक्राबाद, वडजी व डोंगरेवाडी या आठ गावांच्या निवडणुका २०२२-२३ मध्ये होणार आहेत़
सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या आधिपत्याखाली झाले. यामध्ये २२ महिलांसाठी विविध सवंर्गातून आरक्षण करण्यात आले. अनु. जाती, अनु.जमाती, इतर मागासवर्गीयांचा सवंर्ग व सर्वसाधारण महिलांचा समावेश आहे. लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव निवडणूक नायब तहसीलदार भालचंद्र यादव, नायब तहसीलदार सुजाता हंकारे, स्नेहलता पाटील, अका. सचिन पाटील यांनी त्यांना मदत केली.