तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी
By सूरज पाचपिंडे | Updated: March 17, 2023 17:46 IST2023-03-17T17:46:09+5:302023-03-17T17:46:25+5:30
बाजारात हरभऱ्यास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यासाठी नोंदणी करीत होते

तीन केंद्रांवर काटा हलला, १९४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी
धाराशिव : बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याचा हरभरा कमी दरात खरेदी करून आर्थिक लूट केली जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी शासनाने खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीस मंजुरी द्यावी, अशी मागणी लावून धरीत होते. गुरुवारी जिल्ह्यातील उमरगा, दस्तापूर, गुंजोटी या तीन केंद्रांवर खरेदीस प्रारंभ झाला आहे. एका दिवसात १९४ क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे.
बाजारात हरभऱ्यास कमी भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यासाठी नोंदणी करीत होते; मात्र खरेदीस विलंब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी दरात हरभरा विक्री करावा लागत होता. प्रतिक्विंटल मागे ६०० ते ७०० रुपयांचा घाटा होत असल्याने खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू करण्यास शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून लावून धरली जात होती. गुरुवारपासून ३ खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीस मंजुरी मिळाली आहे. दोन दिवसात तीन केंद्रांवरून नोंदणी केलेल्या १५ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आला होता. संदेश प्राप्त होताच या सर्व शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीस घेऊन आले. तीन केंद्रांवर गुरुवारी १९४ क्विंटल ५० किलो हरभरा खरेदी झाला आहे. येत्या काही दिवसात इतर केंद्रावर खरेदी सुरू होईल, असे जिल्हा विपणन कार्यालयाकडून सांगण्यात आले.