१६ लाख नागरिकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:10+5:302021-01-23T04:33:10+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ लाख नागरिकांसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी व एक औषध निरीक्षक कार्यरत आहे. किराणा दुकान, ...

Food security of 16 lakh citizens on the air | १६ लाख नागरिकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

१६ लाख नागरिकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ लाख नागरिकांसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी व एक औषध निरीक्षक कार्यरत आहे. किराणा दुकान, मेडीकल, हॉटेल्स, खानावळीची तपासणी करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ अपुरे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

अन्न व औषध प्रशासन या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्राव्ये विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले जात असते. नागरिकांना उत्तम प्रतीची औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर माफक दरात औषधे उपलब्ध करून देणे, आदी कामे अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येतात. उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या नागरिकांची गरज भागविण्यासाठी येथे हॉटेल्स, मेडिकल, किराणा दुकान उभी राहिली आहेत. त्यामुळे अशा आस्थापनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. सध्या औषध विभागात दोन औषध निरीक्षक पदे मंजूर असून, एक जागा रिक्त आहे. त्यामुळे एकाच औषध निरीक्षकावर परवाने मंजूर करणे, औषध तपासणी, तक्रारीची चौकशी, खटल्याचा पाठपुरावा करणे, कार्ट कचेऱ्याच्या तारखा करणे आदी कामे करावे लागत आहेत. मागील तीन अन्न विभागात तीन अन्न निरीक्षकाचे पदे मंजूर असून, या जागा भरल्या आहेत. जिल्ह्यात एक हजार २७६ परवानाधारक आस्थापना व १५ हजार १६ आस्थापना नोंदणीकृत आहेत. यात ३७६ परवानाधारक व २ हजार २०० नोंदणीकृत हॉटेल्सची संख्या आहे. आस्थापनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने हा डोलारा सांभाळताना कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होते. असे असतानाही कार्यरत अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.

चौकट...

मेडिकल्सची तपासणीच होत नाही

जिल्ह्यात सुमारे १२५ होलसेल व ७५०रिटेलर मेडिकल्स आहेत. या मेडिकलची प्रत्येक वर्षी तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केवळ एकच औषध निरीक्षक असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण मेडिकलची तपासणी पूर्ण होत नाही.

हॉटेलचीही तपासणी नाही

जिल्ह्यात ३७३ परवानाधारक व २ हजार २०० नोंदणीकृत हॉटेल्स आहेत. या हॉटेल्सच्या तपासणीसाठी तीन अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनाच किराणा दुकान, खानावळीसह इतर आस्थापना तपासणी करावी लागत असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडूनही वर्षभरात पूर्ण हॉटेल्सची तपासणी केली जात नाही.

कोर्ट, कचेऱ्या करण्यातच खर्ची होतो अधिक वेळ तपासणीदरम्यान अनियमितता आढळल्यास दंडात्मक, प्रसंगी संबंधित प्रतिष्ठानावर निलंबनाची कारवाई केली जाते. प्रकरण न्यायालयाकडे वर्ग केले जाते. यात अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर व्हावे, लागत असल्याने, त्यांचे बरेच दिवस या कामकाजात जातात. यामुळे इतर कामांवर परिणाम होतो.

पाॅईंटर...

१६६०३११

जिल्ह्याची लोकसंख्या

९७५

जिल्ह्यातील मेडिकल्स

औषध निरीक्षक

२५००

जिल्ह्यातील हॉटेल्स

कोट...

जिल्ह्यातील हॉटेल्स, किराणा दुकाने, भोजनालये, रेस्टॉरंट याची तपासणी केली जात आहे. ३ अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून, प्रत्येक अधिकाऱ्यास महिन्याला दहा आस्थापना तपासणी व ८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

एस. बी. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: Food security of 16 lakh citizens on the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.