पाच टन टोमॅटोचा वावरात ‘लाल चिखल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 02:30 IST2021-02-09T02:30:00+5:302021-02-09T02:30:38+5:30
दर कोसळले; लाखभराचा खर्च वाया

पाच टन टोमॅटोचा वावरात ‘लाल चिखल’
- बालाजी अडसूळ
कळंब (जि. उस्मानाबाद) : यंदाच्या वर्षी केळी, बटाट्याने शेतकऱ्यांना जेरीस आणलेच आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो पिकानेही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आवळली आहे. दर प्रचंड घसरल्याने अगदी काढणीसही न परवडणाऱ्या टोमॅटोचा वावरात पडून लाल चिखल होत आहे.
नफा अन् उत्पादन खर्च तर सोडा, काही तोड्यांचा काढणी खर्चही पदरी पडला नसल्याचे समोर आले आहे. वाकडी (केज) येथील परमेश्वर आण्णासाहेब कोल्हे, त्यांचे बंधू उत्रेश्वर, ज्ञानेश्वर यांनी एकरभर क्षेत्रात ६ हजार रोपांची लागवड केली होती. त्यांचा लाखावर खर्च वाया गेला.
कथेतील शेतकरी व्यथा वास्तवात...
वाकडी गावाशेजारच्या हसेगाव येथील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांनी चार दशकांपूर्वी, हतबल झालेल्या आबाने भरल्या बाजारात टोमॅटो पायदळी तुडवल्याचे विदारक चित्र आपल्या ‘लाल चिखल’ या गाजलेल्या कथेतून मांडले होते. याचीच पुनरावृत्ती वाकडीत झाली आहे. कोल्हे यांनी आपल्या रानात लगडलेल्या तोड्यातील जवळपास पाचेक हजार किलो माल शेतात काढून फेकला आहे. यामुळे साऱ्या वावरात लालगर्द टोमॅटोचा सडा पडला आहे.
प्रारंभी माल कमी होता व भावही तसा खास नव्हता. पुढे वाढेल या आशेने खर्च सुरूच होता. मात्र, माल वाढत गेला तसा भाव कमी झाला. यामुळे शेवटी दहा-बारा मजुराकरवी काढलेला माल तोट्यात विकला. यातून काढणीचा खर्चही मिळणे कठीण झाले. यामुळे राहिलेल्या तीन, चार तोड्याचा माल पीक मोडत वावरात फेकला आहे. - उत्रेश्वर कोल्हे, शेतकरी