नऊ महिन्यांत पाच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST2021-09-14T04:39:01+5:302021-09-14T04:39:01+5:30
शिराढोण : कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वांत मोठे कार्यक्षेत्र असलेले शिराढोण प्राथमिक आरोग्य. या आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र आणि ...

नऊ महिन्यांत पाच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बदलले
शिराढोण : कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वांत मोठे कार्यक्षेत्र असलेले शिराढोण प्राथमिक आरोग्य. या आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र आणि त्यांअतर्गत २६ गावांचा समावेश आहे. असे असतानाही या केंद्राला मागील नऊ महिन्यांत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळाले नसल्याने येथील कारभार सध्या सलाइनवर सुरू आहे.
या रुग्णालयांतर्गत असलेल्या सव्वीस गावांची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे. या परिसरात साखर कारखाना, नॅचरलचे विविध प्रकारचे उद्योग असल्याने मजुरांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी असते. परंतु, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर जोगदंड हे जानेवारी महिन्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले असून, तेव्हापासून हे पद रिक्त आहे. जानेवारी महिन्यापासून येथे पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असून, त्यापैकी फक्त डाॅ. आरती भंगे याच सेवेत आहेत. या कालावधीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने बहुंताश वेळा रुग्णांची गैरसेाय झाल्याचे दिसून आले.
सध्याही या आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्याने एकच वैघकीय अधिकाऱ्यांवर मदार असून, त्यांचाही अपघात झाल्याने मागील दहा दिवसांपासून ते रजेवर आहेत. त्यातच मागील महिनाभरापासून सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण वाढले असून, येथे एकही पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णसेवा कोलमडली आहे. रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. अनेक रुग्ण दुखणे अंगावर काढत असून, काहीजण कळंब, मुरुड येथे जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी नियुक्तीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
कोट........
गेल्या आठवड्यात माझ्या मावस भावाच्या पोटात मध्यरात्री अचानक दुरू लागले. यामुळे आम्ही त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेले. परंतु, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी रजेवर असून, येथील पदभार येरमाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सांगण्यात आले. त्यामुळे आम्हाला उपचाराविना परतावे लागले.
- नीलेश नाईकवाडे, शिराढेाण
शिराढोण आरोग्य केंद्रावर सव्वीस गावच्या लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे. परंतु, पूर्णवेळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. येथे तत्काळ वैद्यकीय अधिकारी देण्याची गरज आहे.
- पद्माकर पाटील, सरपंच, शिराढोण
130921\img20210903164917.jpg
shiradhon