परवान्यासाठी मच्छीमार चढले इमारतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST2021-09-04T04:39:33+5:302021-09-04T04:39:33+5:30
उस्मानाबाद : स्थानिक मच्छीमारांना मासेमारीचा परवाना द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी मच्छीमारांनी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. ठिय्यापासून सुरू ...

परवान्यासाठी मच्छीमार चढले इमारतीवर
उस्मानाबाद : स्थानिक मच्छीमारांना मासेमारीचा परवाना द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी मच्छीमारांनी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. ठिय्यापासून सुरू झालेले आंदोलन मग अर्धनग्न होऊन नंतर शासकीय इमारतीवर चढून आंदोलन झाले. जोपर्यंत परवाना मिळत तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रशासनही हतबल झाले होते.
परंडा व करमाळा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात मत्स्यव्यसायाचा ठेका देण्यात आला आहे. नियमानुसार ठेकेदारास मासेमारीसाठी स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावे लागते. मात्र, तसे न करता ठेकेदाराने परराज्यातील मच्छीमारांकडून काम सुरू केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या परंडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांनी आपणास परवाना मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी उस्मानाबादच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, येथे सहायक आयुक्त उपस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर माशांचा हार त्यांच्या खुर्चीला घालून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मच्छीमारांनी अर्धनग्न होत आंदोलन सुरू केले. तरीही कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करीत संतप्त झालेल्या मच्छीमारांनी मग तिसऱ्या मजल्यावरील छताकडे मोर्चा वळविला. सायंकाळपासून छतावरच तळ ठोकत त्यांनी जोपर्यंत परवाना मिळत नाही, तोपर्यंत खाली उतरायचे नाही, असा निर्धार केला. दरम्यान, आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड हे आंदोलनस्थळी रवाना झाले. आंदोलक वरून उड्या टाकण्याचा इशारा देत असल्याने त्यांनी तातडीने बंदोबस्त वाढवून घेतला. तसेच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे पथकही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. रात्री आठ वाजेनंतरही आंदोलक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नव्हते. ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने शेवटी प्रशासनही हतबल ठरले. जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या या आंदोलनात मच्छीमार कुटुंबीयांसह सहभागी झाले होते.
दरम्यान, यासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त वाघमाेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण न्यायालयीन कामकाजासाठी बाहेरगावी असल्याचे सांगितले.