येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीचा नारळी पौर्णिमा यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. यानुसार बैठक घेऊन पोलीस प्रशासन व देवस्थान ट्रस्टने तसेच जाहीरही केले होते. मंदिराच्या दोन किमी परिसरात भाविकांना अंतरावर प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यावेळी पोलिसांच्या प्रवेश बंदी आदेशानुसार २ कि.मी.अंतरावर भाविकांना आपली वाहने सोडून मंदिर परिसरापर्यंत पायी जाऊन पायरीचे दर्शन घेतले. त्यामुळे दोन वर्षात प्रथमच मंदिर परिसर भाविकांनी पुन्हा गजबजल्याने दिवसभर भक्तिमय वातावरण दिसून आले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या वर्षातून दोन यात्रा भारतात. एक यात्रा चैत्र पौर्णिमेला तर दुसरी यात्रा नारळी पौर्णिमेला असते. पौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. दरम्यान, कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या नारळी पौर्णिमा यात्रेला भाविकांची गर्दी होऊ नये, तसेच राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने नारळी पौर्णिमा यात्रेतील दहीहंडी कार्यक्रमदेखील मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा व भाविकांना मंदिर परिसरात २ कि.मी. अंतरावर प्रवेशबंदीचा निर्णय १९ ऑगस्ट रोजी येथील पोलीस ठाण्यात झालेल्या देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसे प्रसिद्धिपत्रकही जाहीर करण्यात आले होते. मात्र, रविवारी नारळी पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच भाविकांची व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. यामुळे पोलिसांनी भाविकांची वाहने २ कि.मी. अंतरावर रोखल्यानंतर भाविकांनी मंदिरापर्यंत पायी जाऊन पायरीचे दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची गर्दी सुरूच होती.
मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त साजरे होणारे पालखीसह, दहीहंडी, गावप्रदक्षिणा आदी कार्यक्रम रद्द करून मोजक्याच मानकरी, टाळकरी, आराधी, पुजारी यांच्या उपस्थितीत मुख्य मंदिरात पालखी प्रदक्षिणा, काकड आरती, महापूजा असे कार्यक्रम साडेतीन वाजेपर्यंत पार पडले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर बंद असल्याने पायरीच्या मुख्य प्रवेशद्वार कमानीत पायरीला ठेवलेल्या येडेश्वरी देवीच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
मागील वर्षी वर्षी नवरात्रीला ७० कि.मी. पायी येऊन मंदिराचंच पण काय कळसाचंही दर्शन झालं नव्हतं. आज किमान पायरीचं तरी दर्शन झालं, याचं समाधान आहे, असे माढा तालुक्यातील लव्हे येथील महिला भाविक सारिका लुंगसे म्हणाल्या.
नारळी पौर्णिमा यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ११० पोलीस कर्मचारी तर ४ पोलीस अधिकाऱ्यांची बंदोबस्त कामी नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती असल्याचे सपोनि गणेश मुंढे यांनी दिली.