तुळजाभवानीच्या खजिन्यात हेराफेरी प्रकरणात माजी धार्मिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:46 IST2020-09-14T13:42:24+5:302020-09-14T13:46:00+5:30

माजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप देवीदासराव नाईकवाडी यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Filed a case against a former religious manager in a case of embezzlement in Tulja Bhavani's treasury | तुळजाभवानीच्या खजिन्यात हेराफेरी प्रकरणात माजी धार्मिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजाभवानीच्या खजिन्यात हेराफेरी प्रकरणात माजी धार्मिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देदुर्मिळ ७१ नाणी व दागिन्यांची चोरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली.

उस्मानाबाद : श्री तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यातील दुर्मिळ व मौल्यवान वस्तूंच्या हेराफेरीप्रकरणी रविवारी मंदिर संस्थानचे माजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप देवीदासराव नाईकवाडी यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा प्राचीन खजिना व जामदारखान्यात ऐतिहासिक व मौल्यवान अलंकार, सोन्या-चांदीचे दागिने, जडजवाहीर व प्राचीन नाणी होती. यातील काही मौल्यवान वस्तू तत्कालीन अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार करून ताब्यात घेतल्याची तक्रार मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली होती. त्यानुसार, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. या चौकशीत तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देवीदासराव नाईकवाडी यांनी हेतुत: गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले होते. तसा अहवालही सादर करण्यात आला होता.

शिवाय, ८ एप्रिल २०२० रोजी गृह विभागाच्या उपसचिवांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या प्रकरणात नाईकवाडी यांच्याशिवाय इतर कोणाचाही बेकायदेशीर हेतू दिसत नसल्याचे कळविले होते. या अनुषंगाने नाईकवाडी यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची शिफारसही करण्यात आली होती. नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांना प्राधिकृत करून दिलीप नाईकवाडी यांच्याविरुद्ध तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश गुरुवारी काढले होते. त्यानुसार याप्रकरणी रविवारी तहसीलदार कोल्हे यांनी फिर्याद दाखल केली. नाईकवाडी यांच्याविरुद्ध भा.दं.वि.चे कलम ४२०, ४०९, ४६४, ४६७, ४६८,४७१, ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुर्मिळ ७१ नाणी व दागिन्यांची चोरी 
माजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप देवीदासराव नाईकवाडी यांनी २००८ ते २०१८ या कालावधीत देवीच्या खजिन्यातील विविध प्रकारची दुर्मिळ ७१ नाणी व दागिन्यांची चोरी केल्याचे तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Filed a case against a former religious manager in a case of embezzlement in Tulja Bhavani's treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.