‘हरित ईटकूर’ उपक्रमांतर्गत पशु-पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:06+5:302021-04-21T04:32:06+5:30
कळंब : सार्वजनिक ठिकाणी केवळ वृक्ष लागवड करून न थांबता त्यांच्या संगोपनास प्राधान्य दिल्या जाणाऱ्या ‘हरित ईटकूर’ उपक्रमांतर्गत आता ...

‘हरित ईटकूर’ उपक्रमांतर्गत पशु-पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय
कळंब : सार्वजनिक ठिकाणी केवळ वृक्ष लागवड करून न थांबता त्यांच्या संगोपनास प्राधान्य दिल्या जाणाऱ्या ‘हरित ईटकूर’ उपक्रमांतर्गत आता पशु-पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय करण्यात येत असून, तेलाच्या रिकाम्या डब्यांचा वापर करत अन्न व पाणी ठेवणारे साधन झाडाला बांधण्यात येत आहे.
तालुक्यातील ईटकूर येथील युवकांनी एकत्र येत मागच्या दोन वर्षांपासून गावात ‘हरित ईटकूर’ हा उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षतोड व संगोपनाचा अभाव यामुळे वृक्षसंपदा कमी झालेल्या गावात वृक्षाची जोपासना करण्यासाठी, यातून गावाला हरित करत पर्यावरण संवर्धन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र येत काही निधीही उभा केला आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता गावातील पाथर्डी व बसस्टॉप रोडवर दोनशे रॉयल पाम, बाजार मैदानात लिंब, सप्तपर्णी लावण्यात आले आहेत. याशिवाय बँक परिसर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात लिंब, करंजे, चिंच, बदाम, वड, आंबा यांची झाडे लावण्यात आली आहेत. याशिवाय झोपडपट्टी भागात नारळाची झाडे लावत ‘नारळीबाग’ बहरवली आहे. या सर्व झांडाना आळी करणे, माती बळावणे, खुरपणी करणे, पाणी घालणे, छाटणी करणे ही कामे सातत्याने केली जात आहेत. यात पाण्याची पंगत, श्रमदान केले जात आहे. यासाठी अमर आडसूळ, बाबा जगताप यांच्यासह गावातील सर्व युवक मंडळी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करणे, झाडांचा वाढदिवस साजरा करणे असेही काही उपक्रम राबवले जात आहेत. अशा या स्तुत्य अशा हरित ईटकूर उपक्रमाच्या माध्यमातून आता पशु-पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून तलाठी कार्यालय परिसरापासून पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी भांडे ठेवण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
चौकट
तेलाच्या रिमाक्या डब्यांचा वापर
अनेकांकडे पत्र्यापासून बनवलेले तेलाचे रिकामे डबे असतात. या डब्याची कापणी करत विशिष्ट असा आकार देत, त्यात पाणी व धान्य ठेवण्याची सोय केली जात आहे. याकामी उमेश कवडे, देसाई हे साधन बनवण्यास मदत करीत आहेत. गावातील विविध भागात पशु-पक्ष्यांना उन्हाळ्यात कामी येणारी ही साधने ठेवण्यात येणार असल्याचे अमर आडसूळ यांनी सांगितले.