शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले
By सूरज पाचपिंडे | Updated: April 1, 2023 18:21 IST2023-04-01T18:20:37+5:302023-04-01T18:21:04+5:30
शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले
धाराशिव : २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, शासनाने अनुदान न देता शेतकऱ्यांना एप्रिल फुल केल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्यसरकारला बेशरमाची फुले पाठविण्यात आली.
शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत ठाकरे गट शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले, खरीप हंगाम २०२२ मध्ये सततच्या पावसामुळे नुकसानीची नुकसान भरपाई देण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव ३० कोटी २०२२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या संदर्भात ३० नोव्हेंबर रोजी अभ्यास गटाची नेमणूकही करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात व अर्थसंकल्प अधिवेशनात ३१ मार्च २०२३ पूर्वी मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
मात्र, ही घोषणा एप्रिल फुल ठरल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना एप्रिल फुल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आनंदानाचा शिधा न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, सोमनाथ गुरव, राणा बनसोडे आदी सहभागी झाले होते.