ई-पीक पाहणीच्या हायटेक प्रणालीमुळे शेतकरी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST2021-09-10T04:40:12+5:302021-09-10T04:40:12+5:30
कळंब : पीक पाहणीत अचूकता यावी, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग रहावा या उद्देशाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती ...

ई-पीक पाहणीच्या हायटेक प्रणालीमुळे शेतकरी बेजार
कळंब : पीक पाहणीत अचूकता यावी, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग रहावा या उद्देशाने ‘ई पीक पाहणी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी एकीकडे तलाठी शेतकऱ्यांकडे अट्टाहास ठरत असले तरी संबंधित हायटेक प्रणाली मात्र ‘प्रॉपर’ काम करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीचा प्रयोग सध्या तरी ‘रात्र थोडी, सोंगे फार’ या उक्तीप्रमाणे दिसून येत आहे.
जमीनधारक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा व वहिवाटीचा दाखला असलेल्या सातबारा उताऱ्यावरील ‘नमुना नंबर १२’ वर खरीप हंगामातील पिकांची नोंद घेतली जाते. आजवर हे काम गावपातळीवरचे तलाठी करत असत. मात्र, इतर कामाचा व्याप वाढलेल्या तलाठी साहेबांवरील हा ‘लोड’ कमी करून यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ‘ई पीक पाहणी’ हा नवा हायटेक प्रयोग समोर आला. पीक पाहणीत अचूकता, पारदर्शकता व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा, या उद्देशाची जोड देत यासंबंधीच्या कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला गेला. यानुसार आगामी १५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये खरीप हंगामात उभ्या असलेल्या पिकांची नोंद अक्षांश अन् रेखांशातील छायाचित्रासह करणे बंधनकारक केले आहे.
यासाठी स्मार्ट मोबाईलवर एक ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, मागच्या आठ दिवसांत ना यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत, ना पुढाकार घेतलेल्या शेतकऱ्यांचा अन् यासाठी कार्यान्वित केलेल्या ॲपचा ताळमेळ लागत आहे. यामुळे एकीकडे वरिष्ठ गावपातळीवरच्या तलाठी यांना आकडा वाढला पाहिजे यासाठी आग्रह करत आहेत तर तलाठी शेतकऱ्यांकडे ‘ई पीक पाहणी कराच’ असा अट्टाहास करत असताना हजारो शेतकरी यापासून दूरच आहेत.
चौकट...
शेतकरी ६४ हजार, ई पीक पाहणी आठ हजारांवर
कळंब तालुक्यात एकूण ६४ हजार शेतकरी आहेत. यापैकी मागच्या दहा दिवसात केवळ आठ हजारांवर शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे. यासाठीही तलाठी यांना शेतकऱ्यांकडे मोठी विनवणी करावी लागली आहे. त्यात कळंब मंडळात १ हजार ४९, ईटकूर १ हजार २१, मस्सा २ हजार ८८, येरमाळा ८५५, शिराढोण ९८७, नायगाव ८९९, मोहा १ हजार १५१, गोविंदपूर १ हजार २०५ याप्रमाणे शेतकऱ्यांनी गुरुवारपर्यंत ई पीक पाहणी केली आहे.
रात्र थोडी, सोंगे फार...
ई पीक पाहणी उपक्रमांतर्गत पिकाची माहिती अपलोड करण्यासाठी अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. यास ५ दिवसांचा कालावधी उरला आहे. असे असताना पन्नास हजार शेतकरी यापासून दूर आहेत. यामुळे हा उपक्रम ‘रात्र थोडी, सोंगे फार’ ठरत आहे. यास्थितीत बाबासाहेब कोठावळे, भिमा हगारे, राम कोठावळे, अशोस जगताप, आकाश वाघमारे, मनोज शिंदे, सौरभ मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन यास मुदतवाढ देण्याची मागणीदेखील केली आहे.