आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात घसरण; गृहिणींना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST2021-01-25T04:33:19+5:302021-01-25T04:33:19+5:30
जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्या लागवडीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून भाज्यांच्या दरात वाढ झाली ...

आवक वाढल्याने पालेभाज्यांच्या दरात घसरण; गृहिणींना दिलासा
जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्या लागवडीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांपर्यंत भाज्यांचे दर चढेच होते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड केली. परिणामी, मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भाज्यांच्या दरात घसरण होत आहे. पत्ताकोबी, फ्लाॅवर, टोमॅटोचे दर उतरले आहेत. टोमॅटो ५, पत्ताकोबी, फ्लाॅवर १०, बटाटा, काकडी २०, कारले, दोडका, वांगी, भेंडी ४० रुपये तर गवार ५० रुपये दराने विक्री होत आहे. शिमला मिरची ३०, हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. तर शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा ८० रुपये ते १०० रुपये प्रतिकिलोने विक्री झाला.
चौकट...
कोट...
मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर उतरले आहेत. मेथी १० रुपयास एक जुडी विक्री होत आहे. कोथिंबीर ५ रुपये जुडी, पालक १० रुपये, शेपू, चुका १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रत्यांनी सांगितले.
डाळींचे दर जैसे थे
फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे, तर दुसरीकडे डाळीचे दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. सध्या हरभरा डाळ ६१, तूर डाळ ८०, उडीद ९२, मूग ८५, मसूर ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. सोयाबीन तेल १२०, पामतेल ११५, शेंगदाणा तेल १३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
पपई २० रुपये किलो
सफरचंद १२० ते २०० रुपये, चिकू ५० ते ८० रुपये, संत्रा ७० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मोसंबी ८० ते १०० रुपये, रामफळ १२०, पपई २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
प्रतिक्रिया
मागणीच्या तुलनेत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. आणखीन काही दिवस भाज्यांचे दर असेच राहण्याची शक्यता आहे. महादेव साठे, भाजीपाला विक्रेते
तेलाचे दरात काहीअंशी वाढ झालेली आहे. डाळींचे दर मागील महिन्यापासून स्थिर आहेत. हरभरा ६१, तूर ८०, मूग डाळ ८५ रुपये किलोने विक्री होत आहे. अमित गांधी, किराणा व्यावसायिक
तेलाचे दर वाढल्याने खिशाला कात्री लागत आहे. फळभाज्या व पालेभाज्यांचे दर कमी आहेत. डाळींचे दरही सामान्यांच्या आवाक्यात असल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. सचिन झोंबाडे, ग्राहक