ऑनलाइन टास्कमधून जादा रिटर्न; आमिषाला बळी पडल्याने बॅंकखाते झाले साफ
By बाबुराव चव्हाण | Updated: January 11, 2024 17:59 IST2024-01-11T17:59:12+5:302024-01-11T17:59:30+5:30
सायबर गुन्हा नाेंद : पावणेदोन लाख रूपयांची फसवणूक

ऑनलाइन टास्कमधून जादा रिटर्न; आमिषाला बळी पडल्याने बॅंकखाते झाले साफ
धाराशिव : अज्ञाताने काॅल केला. टास्कच्या नावाखाली जादा रिटर्नचे आमिष दाखविले. याच आमिषाला बळी पडून आपल्या डेबिट कार्डचे डिटेल्स समाेरच्या भामट्याला दिले आणि क्षणार्धात बॅंक खात्यातून १ लाख ७६ हजार ५९९ रूपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले. या प्रकरणी बुधवारी सायबर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नाेंद झाला आहे.
उमरगा येथील रहिवासी राेहित विजयकुमार कदम (३०) यांना अनाेळखी व्यक्तीने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फाेन काॅल केला. ‘‘तुम्हाला जाॅबची ऑफर आहे’’, असे सांगून टेलीग्राम ग्रुपला जाॅईन करून वेगवेगळे टास्कचे मेसेज दिले. या टास्कच्या नावाखाली जादा रिटर्नचे आमिष दाखवून पैेसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी राेहित कदम यांनी सुरूवातीला ६ हजार आणि नंतर ४६ हजार रूपये भरले. कालांतराने त्यांनी जादा रिटर्नची मागणी केली. मात्र, येणारा परतावा न देताच समाेरच्या व्यक्तीने त्यांना ग्रुपमधून काढून टाकले. यानंतर फिर्यादी कदम यांनी कस्टमर केअर नंबर उपलब्ध करून त्यावर संपर्क केला.
यानंतर समाेरच्या भामट्याने माेबाईलवर ‘रस्क डेस्क ॲप’ घेण्यास सांगितले. यानंतर फिर्यादीचा माेबाईल ॲक्सेस घेऊन बॅंक डेबिट कार्डची माहिती विचारून घेतली. यानंतर कदम यांच्या एचडीएफसी बॅंक खात्यातून क्षणार्धात तीन टप्प्यात १ लाख ७६ हजार ५९९ रूपये कपात झाले. यानंतर संपर्क केला असता, फाेन लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कदम यांनी सायबर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून बुधवारी अज्ञात भामट्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘रस्क डेक्स’ने घात केला
कस्टमर केअरला फाेन केल्यानंतर रस्क डेस्क ॲप डाऊनलाेड करण्यास सांगितले. त्यानुसार कदम यांनी हे ॲप आपल्या माेबाईमध्ये घेतले. यानंतर समाेरील भामट्याने कदम यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती घेत तब्बल पावणेदाेन लाख रूपये क्षणार्धात काढून घेतले. त्यामुळे त्यांना ना जादा रिटर्न ना सुरूवातीला गुंतविलेले पैसे मिळाले.