पावसाळा संपत आला तरी प्रकल्प जोत्याखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:06+5:302021-09-17T04:39:06+5:30
शिराढोण : पावसाळा संपत आला तरी, कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरातील नाले, तलाव अद्याप जोत्याखालीच आहेत. तालीच्या बाहेर देखील पाणी ...

पावसाळा संपत आला तरी प्रकल्प जोत्याखालीच
शिराढोण : पावसाळा संपत आला तरी, कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरातील नाले, तलाव अद्याप जोत्याखालीच आहेत. तालीच्या बाहेर देखील पाणी पडले नसल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी खरीप हंगामामध्ये मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन नदी, नाले, तलाव भरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, गेल्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर पावसाने दडी मारल्याने जमिनीची तहान अद्याप भागलेली नाही. त्यानंतर पावसाने सुरुवात केली, मात्र तोही रिमझिम बरसला. त्यामुळे शेताच्या बांधाबाहेर देखील पाणी गेले नाही. शिराढोण परिसरातील नदी-नाले अद्याप प्रवाही झालेले नसून, तलावाची पातळी अजूनही जोत्याखालीच आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसाळ्यातील अखेरची नक्षत्रे आता सुरू झालेली असताना देखील जोरदार पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. दररोज येणाऱ्या ढगांकडे शेतकरी नजर लावून बसला आहे. मांजरा धरण ९५ टक्के भरले असली तरी, शिराढोण परिसरातील तलाव, मध्यम प्रकल्पांत मात्र अद्याप साठा वाढलेला नाही. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या मोसमाजवळ आले असून, नेमकी काढणी सुरू होतानाच वरुणराजा हजेरी लावतो की काय, अशी चिंताही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गतवर्षी या महसूल मंडलात आठशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यामुळे ऊस पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. परंतु, यावर्षी अद्याप पाचशे मिलिमीटर देखील पाऊस पडलेला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टिकणार नसल्याने ऊस पिकावर नांगर चालवायची वेळ येते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.
चौकट.....
शिराढोण मंडलामध्ये खरीप पीक जोपासण्यापुरता पाऊस पडला असून, रब्बी आणि उन्हाळ्यात पाणी उपलब्धतेसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. परिसरातील पाझर तलावात देखील पाणी उपलब्ध नाही.
- शिवशंकर पाचभाई, मंडलाधिकारी, शिराढोण
एक महिन्याचा पावसाचा खंड खरीप पिकाने सहन केला असून, काही प्रमाणात खरीप पदरात पडणार असले तरी, रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी जोरदार पावसाची गरज आहे.
- सचिन डावकरे, शेतकरी, शिराढोण
150921\1903img20210915063655.jpg
shiradhon फोटो