अखेर देवस्थान जमिनीचा फेर नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:21+5:302021-09-23T04:37:21+5:30
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामदैवत देवस्थान विठ्ठल रुक्मिणी आणि नागनाथ महाराज मठ या देवस्थानच्या एकूण ३३ ...

अखेर देवस्थान जमिनीचा फेर नामंजूर
शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ग्रामदैवत देवस्थान विठ्ठल रुक्मिणी आणि नागनाथ महाराज मठ या देवस्थानच्या एकूण ३३ एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या कूळ लावून याच्या फेरफारसाठीचा अर्ज तलाठ्याकडे दाखल करण्यात आला होता. मात्र, तहसीलदारांनी तो फेरफार नामंजूर केला.
शिरढोणमधील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची सर्व्हे नंबर ५५ मध्ये २२ एकर तर नागनाथ महाराज मठाची सर्व्हे नंबर ३८ मध्ये ११ एकर जमीन आहे. ही जमीन तहसीलदारांच्या ताब्यात असून, याचा प्रत्येक वर्षी लिलाव होतो. दरम्यान, मागील वर्षी दाभा येथील भिसे नामक व्यक्तीने कुळाचे प्रमाणपत्र आणि त्या प्रमाणपत्राच्या खरेदीखताच्या आधारे फेरफार करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केला होता. तत्कालीन तलाठी बाळहरी कलढोणे यांनी या अर्जावर सविस्तर अभ्यास करून फेरफाराची नोटीस जाहीर केली. या नोटिशीवर संबंधित मंदिराच्या ट्रस्ट आणि गावकऱ्यांनी कूळ प्रमाणपत्र आणि नमुना नंबर ५ ही बनावट असल्याचा ठपका ठेवून आक्षेप नोंदविला होता. यासाठी गाव आणि चूलबंद आंदोलनही करण्यात आले होते. त्यामुळे आक्षेपार्ह फेरफार तहसीलदारांकडे ‘आरओआर’साठी पाठविण्यात आला होता.
दरम्यान, संबंधितांनी कूळ प्रमाणपत्र आणि नमुना नंबर ४ यांचे आधारभूत पुरावे सादर केले नसल्याने, तहसीलदार रोहन शिंदे यांनी हा फेरफार नामंजूर केला. ग्रामस्थांच्या वतीने ॲड.अनुपकुमार परदेशी यांनी बाजू मांडली. या निर्णयाचे गावकऱ्यांनी यांनी स्वागत करून फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
सरपंचांची फौजदारी याचिका
देवस्थानच्या जमिनीला कूळ लागत नसल्याने, कूळ प्रमाणपत्र आणि गाव नमुना नंबर ५ बनावट आहे. त्यामुळे सरपंच पद्माकर पाटील यांनी या प्रकरणी फौजदारी याचिका कळंब न्यायालयात सहा महिन्यांपूर्वी दाखल केली आहे.
सत्याचा विजय
गावचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि नागनाथ महाराज मठ या देवस्थान इनामी जमिनीला कूळ लागत नाही. असे असतानाही संबंधितानी बनावट कागदपत्र तयार करून, जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. तो ग्रामस्थानी हाणून पडला असून, हा सत्याचा विजय आहे.
- नवनाथ खोडसे, शिराढोण.