खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले, ४० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST2021-04-01T04:32:57+5:302021-04-01T04:32:57+5:30
उस्मानाबाद : वर्षभरात पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसच्या किंमती दिवसागणिक वाढू लागल्या आहेत. त्यातच आता खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले आहे. ...

खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले, ४० रुपयांची वाढ
उस्मानाबाद : वर्षभरात पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसच्या किंमती दिवसागणिक वाढू लागल्या आहेत. त्यातच आता खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा मार्च मध्ये खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी
वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे गृहिणी मेटाकुटीस आल्या आहेत. खाद्यतेल घेणे परवडत नसल्याने अनेकांनी बिनाफोडणीच्या भाज्या बनविणे पसंत केले आहे. रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर होत असतो. भाजीला फोडणी दिल्याशिवाय, भाज्यांना चवही येत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटूंबात गृहिणी खाद्यतेलाचा वापर तोलून-मापून करीत असते. मात्र, मागील सहा-ते सात महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर गृहीणी फराळाचे पदार्थ बनवित असतात. त्यामुळे दिवाळी सणातही १० ते १५ टक्क्यांनी दर वाढले होते. दिवाळी सणानंतर दरवर्षी तेलांचे भाव कमी होत असतात. मात्र, यंदा दिवाळी सणानंतरही खाद्यतेलाच्या दराचे दर वाढतच आहेत. सध्या, करडी तेल १४५, सूर्यफूल तेल १६१, शेंगदाणा तेल १८० रुपये, सोयाबीन तेल १३२ तर पामतेल १२० रुपये किलोने विक्री होत आहे. सूर्यफूल, सोयाबीन, पामतेल, शेंगदाणा तेलाचे दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे बहुतांश गृहिणी आता बिनाफोडणीची भाजी बनविण्यास प्राधान्य देत आहेत.
खाद्यतेलाचे दर मार्च २०२० मार्च २०२१
प्रति किलो
करडी १४० १४५
सूर्यफूल १३४ १६१
शेंगदाणा १५५ १८०
सोयाबीन ९० १३२
पामतेल ८८ १२०
मार्च महिन्यात उच्चांकी वाढ
मागील वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात खाद्यतेलाच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. प्रतिकिलो ३० ते ४० रुपये अधिकचे माेजावे लागत आहेत.
कशामुळे झाली भाववाढ
देशात अर्जिटिना व ब्राझिल या दोन देशात तेलाची आयात होते. अर्जेटिना देशात दोन महिने संप होता. शिवाय, गतवर्षी तेलधान्याच्या उत्पादनातही घट झाली. त्यामुळे खाद्यतेलाचे दर वाढत आहेत.
कोट...
या वर्षात खाद्यतेलाच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचे दर ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीन, पामतेल, शेंगदाणा या तेलासह मागणी वाढली. परिणामी, या तेलाच्या दरातही वाढ झाली आहे.
अमित भराटे, व्यावसायिक
गृहिणींच्या प्रतिक्रिया
कोरोनाच्या लॉकडाऊमुळे आर्थिक अडणींचा सामना करावा होता. यातच मागील दहा महिन्यांपासून खाद्यतेलांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे आता बिनाफोडणीची भाजी करावी लागत आहे.
पूनम गजधने
सिलिंडर गॅसच्या किंमतीत भरसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यासोबतच आता खाद्यतेलाच्या दराही वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे दर प्रत्येक महिन्यात वाढतच आहेत. त्यामुळे आता एक किलो ऐवजी अर्धा किलो तेल खरेदी करावे लागत आहे.
मुमताज सय्यद
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. मात्र, शासन जिवनाश्यक वस्तूंच्या किंमती कमी करण्याऐवजी वाढवित आहे. खाद्यतेलाचे दर कधीनव्हे ऐवढे वाढत आहेत. शासनाने दरावर नियंत्रण ठेवून, सामान्यांना दिलासा द्यावा.
कल्पना घरबुडवे,