तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबादला डच्चू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:36+5:302021-09-11T04:33:36+5:30
उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार ...

तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबादला डच्चू?
उस्मानाबाद - तुळजापूर, उमरग्यासह जिल्ह्याच्या अन्य भागात मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. असे असतानाही वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजनेत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे बंजारा समाज बांधवांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्याचे शिष्टमंडळ मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहे.
मागासवर्गीय वस्ती विकास याेजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने तांड्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजना हाती घेण्यात आली. काॅंग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना ही याेजना संपूर्ण राज्यभरासाठी लागू हाेती. यानंतर राज्यात भाजपाची सत्ता आली. यानंतर त्यांनी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना करून प्रस्ताव राज्यस्तरावर मागविण्यास सुरूवात केली. यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने समितीचे अध्यक्षपद त्या-त्या मतदार संघाच्या आमदारांकडे दिले. दरम्यान, समितीचे अध्यक्षपद पूर्वीप्रमाणे बंजारा समाजातील व्यक्तीकडे असावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येत हाेता. या अनुषंगाने मंत्री वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतानाच दुसरीकडे या याेजनेत अवघ्या ११ जिल्ह्यांचाच समावेश केला आहे. त्यामुळे तांड्यांची लक्षणीय संख्या असलेल्या अन्य जिल्ह्यांचे काय, असा प्रश्न आता समाजबांधवांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. जे अकरा जिल्हे निवडले आहेत, त्यात बुलडाणा, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, साेलापूर, औरंगाबाद, लातूर, हिंगाेली आणि वाशीमचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांच्या यादीत १३१ तांडे असलेल्या उस्मानाबादचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही. त्यामुळे या तांड्यांच्या विकासासाठी निधी आणायचा काेठून? असा प्रश्न आता बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील तांड्यांची संख्या लक्षात घेता, शासनाने या याेजनेसाठी निवडलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे महेश पाटील यांनी केली आहे.
चाैकट...
शिष्टमंडळ मुंबईला जाणार...
जिल्ह्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, उमरगा, कळंब आदी तालुक्यांत मिळून सुमारे १३१ तांडे आहेत. मात्र, तांडा वस्ती याेजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तांड्यांवर विकासाची कामे करताना निधीचा प्रश्न भेडसावू शकताे. सदरील प्रश्न लक्षात घेऊन आम्ही मुंबई येथे जाऊन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहाेत, असे समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
कार्यालयास लेखी आदेश नाही...
तांडा वस्ती सुधार याेजनेतून उस्मानाबाद वगळल्याची कल्पना नाही. अथवा तसे लेखी पत्र शासनाकडून आमच्या कार्यालयास आलेले नाही, असे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब अरावत यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.