‘महाआवास’मुळे वाशी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:53+5:302021-09-06T04:36:53+5:30

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव-जनकापूर ग्रुपग्रामपंचायतीने राज्यात राबवल्या गेलेल्या महाआवास मोहिमेत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळवत नवतरुण असलेल्या ग्रामपंचायतीच्या ...

Due to 'Mahaavas', Vashi Gram Panchayat has been honored | ‘महाआवास’मुळे वाशी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

‘महाआवास’मुळे वाशी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव-जनकापूर ग्रुपग्रामपंचायतीने राज्यात राबवल्या गेलेल्या महाआवास मोहिमेत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळवत नवतरुण असलेल्या ग्रामपंचायतीच्या शिलेदारांनी आपली चुणूक दाखवली आहे. या मोहिमेत वाशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. त्यांच्या उपस्थितीतच पारगावच्या पदाधिकारी यांनी आयुक्तांच्या हस्ते ३ सप्टेंबर राेजी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले.

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळत असताना सुरुवातीला पंचायत समितीस्तरावर उद्दिष्ट येत. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात विभागणी करून लाभार्थ्यांना घरकुल मिळते. त्यामुळे प्रत्येक गावात चार-पाच घरकुले मिळत असत. परिणामी, पात्र लाभार्थ्यांनाही घरकुलांची प्रतीक्षा करावी लागत हाेती. ही योजना गतिमान व्हावी व या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुलांचा लाभ मिळावा म्हणून राज्यात महाआवास मोहीम राबवण्यात आली. पारगाव येथे या मोहिमेत १८ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली हाेती. यातील सर्वच लाभार्थ्यांना एकाच वेळी वाशीचे गटविकास अधिकारी यांनी मार्कआउट देऊन कामाला सुरुवात करण्यास सांगितले. घरकुल योजनेतील लाभार्थी यांना येणाऱ्या अडीअडचणींबाबत वेळोवेळी गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी मार्गदर्शन केले होते. १८ पैकी १६ लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे पूर्ण केली. या कामांची दखल घेत पारगाव ग्रामपंचायतीचा पहिला गौरव १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला हाेता. विभागाच्या यादीतही पारगाव ग्रामपंचायतीने आठ जिल्ह्यांतून पहिला क्रमांक मिळवल्याने पारगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह सरपंच महेश कोळी, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांना देण्यात आले. यावेळी हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र वाशीचे गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकाण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण, ग्रा.पं. सदस्य नवनाथ आखाडे, धनंजय मोटे, राजाभाऊ कोळी यांच्यासह बाबा घोलप, समाधान मोटे ,चेतन तातुडे, सारंग मोटे, प्रकाश मोटे, महादेव मोटे, अमोल गायकवाड, प्रवीण मोटे उपस्थित होते.

वाशी तालुक्याला या महाआवास मोहिमेसाठी आलेल्या उद्दिष्टांपैकी पारगाव ग्रामपंचायतीला जास्त उद्दिष्ट होते. या उद्दिष्टासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, त्यासोबतच पंचायत समितीचे कर्मचारी यांच्या सहकार्याने व विशेष म्हणजे घरकुल लाभार्थ्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने हे यश संपादन करता आले आहे.

- विलास खिल्लारे, गटविकास अधिकारी, वाशी

महाआवास मोहिमेत सर्वांच्या सहकार्याने पारगाव ग्रामपंचायतीने विभागीयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशामध्ये सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग महत्त्वाचा होता. गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांचे या कामी वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने हे यश संपादन करता आले. यापुढेही सर्वांच्या सहकार्यातून पारगाव ग्रामपंचायत काम करत राहील.

- महेश कोळी, सरपंच, पारगाव

050921\img-20210905-wa0010.jpg

महा आवास योजनेचे प्रशस्ती पत्र स्विकारताना वाशीचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे ,सरपंच महेश कोळी,उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण,ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख सह ग्रा.प.चे सदस्य उपस्थित होते

Web Title: Due to 'Mahaavas', Vashi Gram Panchayat has been honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.