फोटो (३-१) संतोष मगर
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव शिवारातील महावितरण कंपनीचा वीजपुरवठा करणारा ट्रान्सफाॅर्मर जळून दोन महिने उलटले, तरीही नव्याने बदलून मिळाला नसल्याने पाण्याअभावी १० शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी विद्युत खांबाजवळ धरणे आंदोलन केले.
सुरतगाव शिवारात महावितरण कंपनीचा अतकरे डीपी असून, विजेच्या कमी दाबामुळे तो दोन महिन्यांपूर्वी जळाला आहे. तो ट्रान्सफाॅर्मर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप बदलून दिला नाही. त्यामुळे १० शेतकऱ्यांच्या मोटारी दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, ऊस, द्राक्षबाग आदी पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे रविवारी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या ट्रान्सफाॅर्मरसाठी उभ्या केलेल्या खांबाजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी औदुंबर पाटील, विजय माने, आनंदा गुंड, नवनाथ गुंड, माजी उपसरपंच राम गुंड, छबू गुंड, शिवाजी गुंड आदी शेतकरी हजर होते.