मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगार; प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ-बहीण उतरले रस्त्यावर
By बाबुराव चव्हाण | Updated: February 13, 2025 17:03 IST2025-02-13T17:02:35+5:302025-02-13T17:03:52+5:30
युवा कार्यप्रशिक्षण कालावधी ३६ महिने करा; धाराशिवमध्ये निघाला मूक माेर्चा

मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगार; प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ-बहीण उतरले रस्त्यावर
धाराशिव : विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्यात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण याेजना हाती घेतली हाेती. सरकारी तसेच खाजगी अस्थापनेत त्यांना सहा महिन्यांसाठी नियुक्त करून प्रशिक्षण तसेच मानधनही देण्यात आले. सध्या यांचा कार्यकाळ संपत आला आहे. प्रशिक्षण घेवूनही आम्ही बेराेजगार हाेणार असल्याचे सांगत नियुक्तीचा कालावधी ३६ महिने करावा, अशी मागणी करीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक माेर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातील सुमारे पावणेपाच हजार लाडके भाऊ-बहीण रस्त्यावर उतरले हाेते.
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने सुशिक्षित बेराेजगार लाडके भाऊ-बहिणींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली हाेती. योजनेतून १२ वी उत्तीर्ण बराेजगार तरूणांना ६ हजार, आयटीआय आणि पदविकाधारकांना ८ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्यांना १० हजार रुपये विद्यावेतन जाहीर केले. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी अस्थापनेवर सुमारे ४ हजार ९४९ लाडके भाऊ-बहीण नियुक्त केले. यापैकी काहींचा प्रशिक्षण कालावधी १३ फेब्रुवारी राेजी सरला. काहींचा १६, काहींचा २१ तर काहींचा कालावधीत २७ फेब्रुवारी राेजी संपत आहे.
‘‘प्रशिक्षण कालावधी सरल्याबराेबर आम्ही सुशिक्षित, प्रशिक्षित बेराेजगार हाेत आहाेत. त्यामुळे शासनाने आमचा कालावधी वाढवून ताे ३६ महिने करावा’’, अशी मागणी करीत गुरूवारी जिल्हाभरातील तब्बल ४ हजार ९४९ हून अधिक लाडके भाऊ-बहीण रस्त्यावर उतरले. महामानव डाॅ. बाबासाहेबा आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूक माेर्चा काढण्यात आला. हा माेर्चा छत्रपती शिवाजी महाराज चाैकातून जिल्हा कचेरीवर धडकला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन धाडले.
आऊटसाेर्सिंग बंद करा
सरकारी कार्यालयामध्ये वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून (आऊटसाेर्सिंग) कंत्राटी तत्वावर कर्मचारी घेतले जात आहेत. यातून त्यांची खूप पिळवणूक हाेते. शासनाने अशा स्वरूपाचे आऊटसाेर्सिंग बंद करून थेट शासन टू शासकीय कार्यालय या पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण याेजनेतील बेराेजगार लाडके भाऊ-बहिणींना नियुक्ती द्यावी, अशी मागणी यावेळी केली.
मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगार
मूक माेर्चामध्ये सहभागी प्रशिक्षार्थिंनी आपल्या हातात फलकही घेतले हाेते. यापैकी काही फलक धाराशिवकरांचे लक्ष वेधून घेत हाेते. यापैकीच ‘‘मायबाप सरकार करू नका पुन्हा आम्हाला बेराेजगार’’ हा फलक लक्षवेधी ठरला.