‘झेडपी’चा शिक्षण विभाग नकाे रे बाबा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:34 IST2021-09-19T04:34:06+5:302021-09-19T04:34:06+5:30
नशिबी पुन्हा प्रभारीराज : रुजू हाेण्यापूर्वीच शिक्षणाधिकारी राठाेड यांनी करून घेतली बदली उस्मानाबाद : निती आयाेगाने उस्मानाबादच्या भाळी मागासलेपणाचा ...

‘झेडपी’चा शिक्षण विभाग नकाे रे बाबा...!
नशिबी पुन्हा प्रभारीराज : रुजू हाेण्यापूर्वीच शिक्षणाधिकारी राठाेड यांनी करून घेतली बदली
उस्मानाबाद : निती आयाेगाने उस्मानाबादच्या भाळी मागासलेपणाचा शिक्का मारला आहे. हा शिक्का पुसण्यासाठी शैक्षणिक, आराेग्य आदी घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश हाेते. यासाठी काेट्यवधींचा निधी देण्यात आला. असे असतानाच दुसरीकडे ज्यांच्या खांद्यावर शिक्षणविषयक उपाययाेजना पूर्ण क्षमतेने राबवून घेण्याची जबाबदारी असते, ते शिक्षणाधिकारी हे पदच मागील काही वर्षांपासून रिक्त आहे. माेठ्या प्रतीक्षेनंतर साेलापूर येथील शिक्षणाधिकारी संजयकुमार राठाेड यांची उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली; परंतु रुजू न हाेताच त्यांनी सांगली येथे बदली करून घेतली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांच्या नशिबी पुन्हा प्रभारीराज आले आहे.
निती आयाेगाने उस्मानाबादचा मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश केल्यानंतर राजकीय नेत्यांनी आराेपांच्या माध्यमातून चिखलफेक केली. जिल्ह्याच्या भाळी हा शिक्का बसण्यास काेण जबाबदार? यावरून पत्रकबाजीही झाली. दरम्यान, मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी काेट्यवधी रुपयांचा निधी दिला गेला. या माध्यमातून खासकरून शिक्षण आणि आराेग्य या दाेन घटकांवर भर दिला गेला. मात्र, निती आयाेगाने सुचविलेल्या उपाययाेजनांची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी असलेले शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणजेच शिक्षणाधिकारी हे पद मागील काही वर्षांपासून रिक्त आहे, तेव्हापासून या पदाच्या बाबतीत खाे-खाे सुरू आहे. नियमित शिक्षणाधिकारी जगताप निलंबित झाल्यानंतर काही महिने तत्कालीन गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांच्याकडे चार्ज देण्यात आला. यानंतर सविता कुंभार यांची काही महिने सूत्रे सांभाळली. पदाेन्नतीच्या माध्यमातून सविता भाेसले यांची नियमित शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्याही वर्षभरातच सेवानिवृत्त झाल्या आणि पुन्हा प्रभारीराज सुरू झाले. शिवाजी जाधव यांच्याकडे या पदाची सूत्रे आली. त्यांनी काही महिने कामकाज पाहिल्यानंतर सेवानिवृत्त झाले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी जाधव यांच्याकडे प्रभार देण्यात आला. ते सेवानिृत्त झाल्यानंतर पुन्हा सविता कुंभार यांच्याकडे सूत्रे आली. त्यांची उस्मानाबादचे गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर काेणीही पदभार घेण्यास राजी नव्हते. त्यामुळे अधीक्षक रामलिंग काळे यांच्याकडे चार्ज देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली. त्यांनी अनेक महिने काम पाहिल्यानंतर उपशिक्षणाधिकारी म्हणून डाॅ. माेहरे रुजू झाले. यानंतर त्यांच्याकडे चार्ज दिला. मध्यंतरी शासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात साेलापूरचे शिक्षणाधिकारी राठाेड यांची उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा आदेश ३० जून राेजी निघाला हाेता. तातडीने चार्ज घेण्याबाबत त्यात नमूद केले हाेते; परंतु अडीच महिन्यांचा कालावधी लाेटूनही त्यांनी चार्ज घेतला नाही. असे असतानाच १६ सप्टेंबर राेजी त्यांच्या बदली आदेशात अंशत: बदल केल्याचे पत्र धडकले. त्यांनी सांगली येथे बदली करून घेतली आहे. त्यामुळे मागासलेपणास कारणीभूत असलेल्या कारणांच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या शिक्षण या घटकाचा दर्जा उंचाविणाऱ्या शिक्षण विभागाच्या नशिबी पुन्हा प्रभारीराज आले आहे. हे असेच सुरू राहिल्यास शिक्षणाचा दर्जा उंचावणार कसा, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
चाैकट...
लाेकप्रतिनिधी लक्ष देणार कधी?
शिक्षण आणि आराेग्य या दाेन बाबींना अत्यंत महत्त्व आहे. शहरी, तसेच ग्रामीण भागातील गाेरगरीब मुलांचे शिक्षण आजही जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांतून हाेते. या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची असते. मात्र, हे पदच तीन-तीन वर्षे रिक्त असेल तर गुणवत्तेचे काय हाेणार? शेजारच्या लातूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नेतेमंडळी चांगल्या अधिकाऱ्यांसाठी प्रयत्न करतात; परंतु आपल्याकडे रिक्त जागा भरण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे विशेष.