तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 11:59 IST2025-09-13T11:56:21+5:302025-09-13T11:59:17+5:30
ही नवीन शुल्कवाढ २० सप्टेंबर २०२५ ते ०८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे.

तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
तुळजापूर: शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने देणगी दर्शन पासच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. भाविकांना आता दर्शनासाठी दुप्पट शुल्क मोजावे लागणार आहे, तर दुसरीकडे जास्तीत जास्त भाविकांना अभिषेक करता यावा यासाठी अभिषेकाच्या संख्येत शंभरने वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात मंदिर प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
वाढीव शुल्क असे असेल:
देणगी दर्शन पास: २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आला आहे.
व्हीआयपी देणगी दर्शन पास: ५०० रुपयांवरून १,००० रुपये करण्यात आला आहे.
स्पेशल गेस्ट पास: २०० रुपयांवरून ५०० रुपये पर्यंत करण्यात आलेला आहे.
ही नवीन शुल्कवाढ २० सप्टेंबर २०२५ ते ०८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीपत्रकावर मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांची स्वाक्षरी आहे.
अभिषेक करण्याची संधी वाढली
देणगी शुल्कात वाढ झाली असली तरी, भाविकांना दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. सकाळच्या अभिषेकाची संख्या ३०० वरून ४०० करण्यात आली आहे. त्यामुळे आता दररोज १०० अधिक भाविकांना श्री तुळजाभवानी देवीचा अभिषेक करता येणार आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता येईल.
तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाचे असे आहे वेळापत्रक
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सायंकाळी मंचकी निद्रेने सुरुवात होईल. पुढील नऊ दिवस देवीची निद्रा सुरू राहील. २२ सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल. यानंतर २३, २४ व २५ रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक निघणार आहे. २६ रोजी ललित पंचमीनिमित्त देवीची रथालंकार पूजा बांधण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी मुरली अलंकार, २८ रोजी शेषशाही, तर २९ रोजी भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात येईल. ३० रोजी दुर्गाष्टमीनिमित्त महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा होईल.