दरराेज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:34 IST2021-04-20T04:34:08+5:302021-04-20T04:34:08+5:30
कोरोना संसर्गाने थैमान घातले असल्याने प्रत्येक व्यक्ती सर्दी, खोकला असा त्रास होऊ लागला की, आपणास कोरोना तर झाला नसेल ...

दरराेज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !
कोरोना संसर्गाने थैमान घातले असल्याने प्रत्येक व्यक्ती सर्दी, खोकला असा त्रास होऊ लागला की, आपणास कोरोना तर झाला नसेल ना असा प्रश्न पडत आहे. अशा स्थितीत आपल्या फुफ्फुस व्यवस्थित आहे का, हे तपासण्यासाठी नागरिक सिक्स मिनिट वॉक टेस्ट करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची माहिती मिळणेही सोपे होत आहे. सिक्स मिनिट वॉक टेस्ट ही एक सहा मिनिटे चालण्याची सोपी व घरगुती पद्धत आहे. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची कमतरता जाणून घेण्यात मदत होते. जेणेकरून गरजूंना योग्य वेळी रुग्णालयात दाखल होता येते. चढ-उतार नसलेल्या कडक जमिनीवर चाचणी करावी. चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणाची निवड करावी. ताप, सर्दी, खोकला किंवा काेरोनाचे इतर लक्षणे असलेल्या व्यक्ती, तसेच कोविड विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी ही चाचणी करावी. ६० वर्षांपुढील नागरिकांनी दम लागत असल्यास ३ मिनिटेच चालावे, असे डॉक्टरांनी सांगितले.
असे लागणार साहित्य
घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर
कोणी करायची ही टेस्ट
ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.
अशी करा चाचणी
आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.
...तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर...
चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर...
चालल्यानंतर धाप येणे, दम लागल्यासारखे होत असेल तर...
तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
कोट...
सार्वजनिक आरोग्य विभागाने सहा मिनिटे वॉक टेस्टची जनजागृती केली जात आहे. गृहविलगीकरणात असलेले सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांसाठी ही टेस्ट उपयुक्त ठरते. सहा मिनिटे चालल्यानंतर तीन डिग्री ऑक्सिजन कमी झाल्यानंतर रुग्णास पुढील उपचारासाठी रुग्णालय गाठता येते. नागरिकांनी चाचणी घरच्या घरी केल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकेल.
-डॉ. एन.बी. गोसावी, सर्जन