राखीव जागेवर रबरी स्टँप नको !
By Admin | Updated: October 22, 2016 00:33 IST2016-10-22T00:21:44+5:302016-10-22T00:33:33+5:30
उस्मानाबाद : महिलांसाठी राखीव असलेल्या जागावर उमेदवारी देताना उच्च शिक्षीत सक्षम महिलेऐवजी एखाद्या कार्यकर्त्याच्याच नातेवाईकाला उमेदवारी देण्याकडे

राखीव जागेवर रबरी स्टँप नको !
उस्मानाबाद : महिलांसाठी राखीव असलेल्या जागावर उमेदवारी देताना उच्च शिक्षीत सक्षम महिलेऐवजी एखाद्या कार्यकर्त्याच्याच नातेवाईकाला उमेदवारी देण्याकडे प्रमुख पक्षांचा कल असतो. तशीच परिस्थिती राखीव जागावर दिल्या जाणाऱ्या उमेदवारीबाबत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तब्बल ५८ टक्के नागरिकांनी राखीव जागावर रबरी स्टँप उमेदवार देण्याऐवजी उच्चशिक्षीत, प्रश्नांची जाण असलेला उमेदवार द्यावा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. असा उमेदवार दिला तर त्या पक्षालाही याचा फायदा होईल, असे म्हटले आहे.
महिलांसाठी राखीव सुटलेल्या जागावर सुशिक्षीत, सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या महिलांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत आहे. काहीसे असेच मत नागरिकांनी राखीव जागावर दिल्या जाणाऱ्या उमेदवारीबाबत व्यक्त केले आहे. प्रमुख राजकीय पक्ष ही राखीव जागेवरील निवडणूक लढविताना ती फारसी गांभिर्याने घेत नाहीत. किंबहूना आपल्या मर्जीतील उमेदवार रहावा, शिवाय तो निवडून आल्यास त्याने आपलेच ऐकावे असा कयास संबंधित पक्षाच्या श्रेष्ठींचा असतो. या प्रकारामुळे उमेदवार निवडून आल्यानंतरही त्या पक्षाला त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचेच अनेकवेळेस दिसून येते. त्यामुळेच राखीव जागावर उमेदवारी देताना त्या प्रवर्गातील उच्च शिक्षीत तसेच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्याला उमेदवारी द्यावी, असे या ५८ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. राखीव जागावर उमेदवारी देताना त्याच प्रवर्गातील सक्षम उमेदवाराला डावलले जात नाही, असे मतही २८ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. तर या प्रश्नावर १४ टक्के नागरिकांनी होय राखीव जागावर उमेदवारी देताना सक्षम, उच्च शिक्षीत इच्छुकाला काही प्रमाणात डावलले जाते असे मत नोंदविले आहे.नागरिकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक शहरात पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. अलिकडील काळात नगरपालिकांना केंद्र तसेच राज्याच्या विविध योजनाद्वारे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मिळतो. हा निधी खर्चूनही नागरिकांच्या समस्या काही सुटलेल्या नसल्याचेच कुठल्याही शहरामध्ये गेल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. मात्र त्यानंतरही पाच वर्ष पालिका तसेच सदस्यांच्या नावे बोटे मोडणारे नागरिक निवडणूक काळात मात्र या प्रश्नांकडे कानाडोळाच करीत असल्याचे या सर्वेक्षणावेळी दिसून आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक प्रश्नावर चर्चा करता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तब्बल ६० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर निवडणूक काळात उमेदवार तसेच पक्षांना याबाबत जाब विचारतो असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के होते. तर १५ टक्के नागरिकांनी याबाबत काही प्रमाणात चर्चा होते असे मत नोंदविले. (प्रतिनिधी)