नळदुर्ग : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी येथील नगर परिषदेला भेट देऊन शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांनी वंचित लाभार्थ्यांना घरकूल मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही दिली.
या वेळी आ. धस यांच्या समवेत भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲड. व्यंकटराव गुंड हेही उपस्थित होते. आ. धस यांचे पालिकेत आगमन झाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पालिकेच्या वतीने नगरसेवक नय्यर जहागिरदार, उदय जगदाळे, शाहाबाज काझी, मुश्ताक कुरेशी, बसवराज धरणे यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी आढावा बैठकीत नगरसेवक तसेच नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. विशेषत: रहीम नगर भागातील युवकांनी आमच्या भागात गेल्या वीस वर्षांपासून रस्ते व नाल्याची कामे झाली नसल्याची तक्रार केली. नगरसेवकांनीही नगराध्यक्षा विकासकामे करण्यात अपयशी ठरल्या असून, एकाच कामाच्या अनेकदा निविदा काढून न.प.च्या पैशाचा अपव्यय करीत असल्याचा आरोप केला.
या वेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिकेने यशस्वीपणे राबवावी. जे लाभार्थी गायरान, गावठाण किंवा सरकारी जागेवर राहतात व ज्यांच्याकडे आठ-अ चा उतारा नाही अशांना नियमानुसार ३२५ स्क्वेअर फूट जागेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देता येतो. शहरात सध्या ४०० लाभार्थ्यांकडे आठ-अ उतारा नसल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा लाभ मिळत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. पुढच्या आठवड्यात यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लाऊन या ४०० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
या वेळी नगरसेवक नय्यर जहागिरदार, शाहाबाज काझी यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला. बैठकीस नगरसेवक दयानंद बनसोडे, नगरसेविका छमाबाई राठोड, भारती बनसोडे, भाजपचे सुशांत भुमकर, भाजपचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, धीमाजी घुगे, बबन चौधरी यांच्यासह लोहारा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिंदे, न.प.चे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
चौकट....
डम्पिंग ग्राउंडचा विस्तार वाढवा
सध्या अस्तित्वात असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा विस्तार वाढवून तो सात एकर जागेवर करून ओला तसेच सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. शहरातील शेतकऱ्यांसाठी नगरपालिकेने रोहयोअंतर्गत शेततळे, विहिरी देऊन आधार देण्याचे काम करावे, असे आवाहन आ. सुरेश धस यांनी या वेळी केले.