Dharashiv: लोहाऱ्याचा 'हायटेक' विक्रम! एका दिवसात ४४ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:18 IST2025-09-17T18:15:09+5:302025-09-17T18:18:22+5:30

गावकऱ्यांसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन टॅक्स आणि मोबाईल ॲप;  लोहारा तालुक्याने बदलला गावचा चेहरा.

Dharashiv: 'Hi-tech' blacksmith's record! 44 gram panchayat websites online in a day | Dharashiv: लोहाऱ्याचा 'हायटेक' विक्रम! एका दिवसात ४४ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट लाँच

Dharashiv: लोहाऱ्याचा 'हायटेक' विक्रम! एका दिवसात ४४ ग्रामपंचायतींच्या वेबसाईट लाँच

- बालाजी बिराजदार
लोहारा ( जि. धाराशिव ) :
तालुक्यातील सर्व ४४ ग्रामपंचायती आता स्वतंत्र वेबसाईटसह ऑनलाइन झाल्या असून, हा विक्रम घडवणारा लोहारा तालुका महाराष्ट्रातील पहिला हायटेक तालुका ठरला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या प्रेरणेतून गटविकास अधिकारी जगदेव वग्गे यांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे.

यशदाचे मास्टर ट्रेनर मारुती बनसोडे यांच्या माध्यमातून अभिनव आयटी सोल्युशन प्रा. लि. पुणेचे कार्यकारी संचालक प्रा. मुरलीधर भुतडा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. निडली हायटेक ग्रामपंचायत या प्रकल्पाच्या अनुभवावर आधारित या कंपनीने स्वतःच्या सीएसआर फंडातून सर्व ग्रामपंचायतींना मोफत वेबसाईट उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे फक्त एका दिवसात या सर्व वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकारी व संगणक चालक यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन स्वतःच्या हाताने वेबसाईट कशी तयार करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर काही तासांतच सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या वेबसाईटवर माहिती अपलोड करून साइट कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.हा डिजिटल उपक्रम केवळ वेगळेपणाच नव्हे तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेच्या मूल्यांकनामध्ये अतिरिक्त १० ते १५ गुण मिळवण्यास मदत करणार असल्याने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

या कामात अति. मुख्य कार्यकारी अधिकारीअनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.)अनंत कुंभार,विस्तार अधिकारी सतीश शटगार, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका व्यवस्थापक विकास पवार यांचे मोलाचे योगदान लाभले.

ग्रामपंचायतच्या 'या' सुविधा मिळणार
प्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट,हायटेक ॲडव्हान्स मॉड्यूल्सची जोड,प्रत्येक घरासाठी क्युआर कोड व्यवस्था,ऑनलाईन टॅक्स भरण्याची सुविधा नागरिकांसाठी Alerto SOS ॲप विद्यार्थ्यांसाठी दरमहा स्पर्धात्मक ऑनलाईन प्रश्नपत्रिका,शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर उपलब्ध,सरपंच व सदस्यांना थेट संपर्कासाठी ऑटोमेटेड व्हाट्सअप सेवा,ऑनलाईन तक्रार नोंदणी व दाखले मिळविण्याची सोय,मोबाईल ॲपमधून ग्रामपंचायत व्यवस्थापन व सर्व १ ते ३३ नमुन्यांचे डिजीटल नियोजन

 ४४ ग्रामपंचायती ऑनलाइन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या प्रेरणेतून लोहारा तालुक्यातील सर्व ४४ ग्रामपंचायतींना एकाच वेळी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. ग्रामपंचायतींच्या विकासात तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने पारदर्शकता वाढेल आणि गावोगावी नवी संधी निर्माण होतील.
जगदेव वग्गे,गटविकास अधिकारी,पंचायत समिती,लोहारा

कार्यक्षमता वाढेल
ग्रामपंचायतींचे कामकाज पूर्णपणे ऑनलाइन होत आहे. नागरिकांना दाखले, कर, तक्रारी व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची कार्यक्षमता अधिक वाढेल.
- एम. टी. जगताप, ग्रामपंचायत अधिकारी, एकोंडी (लो), ता. लोहारा

अभिमानाची बाब
गावाची स्वतंत्र वेबसाईट ही प्रत्येक गावकऱ्याच्या अभिमानाची बाब आहे. डिजिटल माध्यमातून गावाचे नाव राज्यभर पोहोचेल व नागरिकांचा सहभाग अधिक वाढेल.
- वैभव पवार, सरपंच,माळेगाव, ता. लोहारा

Web Title: Dharashiv: 'Hi-tech' blacksmith's record! 44 gram panchayat websites online in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.