भाविकांनी घेतला हात आखडता, यंदा तुळजाभवानी देवस्थानच्या उत्पन्नात ३४ लाखांची तूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:22 IST2025-10-11T16:22:51+5:302025-10-11T16:22:51+5:30
यंदा ऐन नवरात्रीच्या काळातच पावसाने अनेक भागांना झोडपून काढले. पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे भाविकांचा ओघ काहीसा कमी झाला.

भाविकांनी घेतला हात आखडता, यंदा तुळजाभवानी देवस्थानच्या उत्पन्नात ३४ लाखांची तूट
धाराशिव : यंदा ऐन नवरात्रीच्या काळातच राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो भाविकांना या काळात तुळजापूर गाठता आले नाही. शिवाय, पावसाने झालेले नुकसान अन् देणगी दर्शनाचे वाढलेले दर यामुळे यंदा तुळजाभवानी देवस्थानच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत ३४ लाखांहून अधिकची तूट आली आहे.
दरवर्षी नवरात्र काळात व कोजागरी पौर्णिमेपर्यंत साधारणत: ७० लाखांहून अधिक भाविकांची तुळजाभवानीच्या दरबारी हजेरी लागत असते. मात्र, यंदा ऐन नवरात्रीच्या काळातच पावसाने अनेक भागांना झोडपून काढले. पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे भाविकांचा ओघ काहीसा कमी झाला. असे असले तरी कोजागरी पौर्णिमेला विक्रमी गर्दी होऊन ती कसर काहीशी भरून निघाली. मात्र, पावसामुळे विविध प्रकारे झालेल्या नुकसानीमुळे भाविकांना हात आखडता घेण्याची वेळ आली. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत ३४ लाख ४७ हजार ५०९ रुपयांची उत्पन्नात तूट आली आहे.
गतवर्षी १५ दिवसांत ६ कोटी
मागील वर्षीच्या नवरात्र व पुढील उत्सव काळाच्या १५ दिवसांत ६ कोटी १ लाख ४२ हजार रुपयांचे उत्पन्न देवस्थानला मिळाले होते. यावर्षी हाच उत्सव कालावधी १७ दिवसांचा असतानाही ५ कोटी ६६ लाख ९४ हजार रुपयांचे उत्पन्न मंदिरास मिळाले.
पेड दर्शनातून आली मोठी तूट
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने यंदा पेड दर्शनाचे दर वाढवण्यात आले होते. २०० रुपयांचा पास ३०० रुपये, ५०० रुपयांचा १ हजार रुपये, रेफरल पास २०० रुपयांचे ५०० रुपयांना करण्यात आले होते. यामुळे देणगी दर्शनातून मिळणारे उत्पन्न जवळपास ४१ लाखांनी कमी झाले आहे.
हा आहे सर्वांत मोठा स्रोत
देणगी दर्शनातून गतवर्षी २ कोटी ७१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी हेच उत्पन्न २ कोटी ३० लाखांवर आले आहे. देणगी दर्शन पाससाठी यंदा कॅशसोबतच यूपीआय व ऑनलाइन प्रणालीचा वापर वाढला.
गुप्तदान, प्रसादाला मिळाला प्रतिसाद
यावेळी भाविकांनी गुप्तदानापोटी २० लाख ९३ हजार रुपयांनी देवस्थानची पेटी भरली आहे. तसेच बंद झालेला लाडूचा प्रसाद यंदापासून पुन्हा सुरू करण्यात आला असून, लाडूपोटी ११ लाख ९२ हजार रुपयांचे उत्पन्न देवस्थानला प्राप्त झाले.