वाशीत डेंग्यूचा रूग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:43+5:302020-12-26T04:25:43+5:30

वाशी : वाशी शहरात डेंग्यूचा रूग्ण आढळून आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उपाययोजना सुरू ...

Dengue patient in Vashi! | वाशीत डेंग्यूचा रूग्ण !

वाशीत डेंग्यूचा रूग्ण !

वाशी : वाशी शहरात डेंग्यूचा रूग्ण आढळून आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उपाययोजना सुरू केल्या. नागरिकांनी कोरडा दिवस पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़

वाशी शहरातील झोपडपट्टी भागात वैदवाडी येथे २० वर्षीय युवकास ताप येत असल्यामुळे त्यांनी येथील खाजगी रुग्णालयात तपासणी केली. येथील डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आल्यानंतर नंतर या रुग्णाची येथील खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत डॉक्टरांनी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या. शुक्रवारी यामुळे पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी दीपक सोनवणे यांनी आरोग्य कर्मचाऱ्ंयासह या भागास भेट देऊन पाहणी केली़ या भागातील रहिवाशांनी आपल्या परिसराची स्वच्छता करावी व साठवणुकीचे पाणीसाठे नष्ट करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ या भागातील प्रत्येक नागरिकांच्या घरातील पाणीसाठ्यात ॲबेट टाकण्यात आले असून, ज्या रूग्णांना थंडी किंवा ताप येत असेल त्यांनी घाबरून न जाता शासकीय रूग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे़ प्राथमिक आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक शिवाजी महामुनी, दशरथ शेरकर यांनी आशा कार्यकर्तींच्या मदतीने याबाबत जनजागृती मोहिम राबविली.

चौकट.....

२० किमी अंतरावरील ‘पीएचसी’वर जबाबदारी

वाशी तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र भूम तालुक्यातील पाथरूड येथे स्थलांतरीत केले. सध्या येथे ग्रामीण रूग्णालय असले तरी या रूग्णालयात रूग्ण दाखल झाल्यानंतरच उपचार करण्यात येतात. शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या जवळपास असून, आरोग्याची जबाबदारी वीस किमीवर असलेल्या पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे एखादा साथरोग उद्‌भवल्यास या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. त्यामुळे येथे उपकेंद्राची निर्मितीची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

शहरात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य उपकेंद्र निर्मितीसाठी लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याची गरज आहे़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे तालुकास्तरीय कार्यालय ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात कार्यरत आहे. मात्र, येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे़

फोटो.......

वाशी शहरात डेंग्यूचा रूग्ण आढळून आल्यानंतर पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी दिपक सोनवणे व कर्मचाऱ्यांनी या भागात विविध उपायगोजना राबविल्या.

Web Title: Dengue patient in Vashi!