पुलवामा हल्ल्यामुळे खारिक महागले; काश्मिरमार्गे येणारा माल थांबल्याने परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:37 IST2019-04-02T18:37:06+5:302019-04-02T18:37:17+5:30
खारकांची आयात थांबल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा खारिक व खोबऱ्यांच्या किंमती वाढल्या

पुलवामा हल्ल्यामुळे खारिक महागले; काश्मिरमार्गे येणारा माल थांबल्याने परिणाम
उस्मानाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा सण अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे़ या सणाला खारिक व खोबऱ्यांच्या हारांचा विशेष मान असतो़ परंतु, दीड महिन्यापूर्वी काश्मिर मधील पुलवामा येथील भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मिर मार्गे येणाऱ्या खारकांची आयात बंद झाली असून, यामुळे खारिक प्रतिकिलो ५० रुपयांनी महागली आहे़
मराठी वर्षाचा प्रारंभ गुढी पाडवा सणाने होतो़ यानिमित्त प्रत्येक घरावर गुढी उभारली जाते़ गुढीवर साखरेसोबतच खारिक व खोबऱ्यांचा हार लावण्यात येत असतो़ त्याचबरोबर घरातील बच्चे कंपनींना हार दिला जातो़ दरम्यान दीड महिन्यापूर्वी काश्मिरातील पुलवामा येथे दहशतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील काही जवान शहिद झाले होते़ त्यामुळे कश्मिरमार्गे येणाऱ्या खारकांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ त्यामुळे गुढीपाडव्याला लागणाऱ्या खारिक व खोबऱ्यांचे हार महागले आहेत़ गतवर्षी ७० रुपये किलोने मिळणारी खारिक यंदा १२० रुपये किलोने विक्री होत आहे़ खारकांची आयात थांबल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा खारिक व खोबऱ्यांच्या हारांच्या किंमतीही २५ टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़
आहे त्या मालावरच हार निर्मिती
फेबु्रवारी महिन्यात झालेल्या पुलवामा हल्यामुळे काश्मिर मार्गे येणारी खारकांची आयात बंद झाली आहे़ त्यामुळे गुढीपाडव्यासाठी उपलब्ध खारकांवरच हार निर्मिती करण्यात आली़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा खारिक ५० रुपये किलोने महागली आहे़
- महेश चौधरी , व्यापारी