शाळा परिसरात साप, विंचवाचा धोका; झाडेझुडपेही वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:37+5:302021-09-16T04:40:37+5:30
लोहारा : कोरोनामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद, संस्थेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांमध्ये झाडेझुडपे, गवत वाढले असून, साप, विंचवाचा धोका ...

शाळा परिसरात साप, विंचवाचा धोका; झाडेझुडपेही वाढली !
लोहारा : कोरोनामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद, संस्थेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांमध्ये झाडेझुडपे, गवत वाढले असून, साप, विंचवाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोहारा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६८ तर खाजगी संस्थेच्या ४३ शाळा आहेत. जिल्हा परिषदेचे ३४७ तर खाजगी २८० शिक्षक आहेत. तालुक्यात विद्यार्थी १६ हजार ५४९ आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शाळा बंद आहेत. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुरुजी शाळेपासून दूरच असल्याचे चित्र होते. मात्र, दुसऱ्या लाटेत शिक्षकांना शाळेत हजेरी लावण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शाळेत पन्नास टक्के शिक्षक हजेरी लावत असले तरी काही ठिकाणी गुरुजीच शाळेत जात नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मागील वर्षापासून शाळा बंद असून, या परिसराच्या स्वच्छतेकडेही काही ठिकाणी दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शाळा परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून, वर्गखोल्यांचीही दुरवस्था झाली आहे. काही शाळांत शिक्षक स्वत: स्वच्छता करीत असल्याचीही उदाहरणे असली तरी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळा परिसरात झाडेझुडपे, गवत वाढल्यामुळे साप, विंचवाचा धोका नाकारता येत नाही. तसेच वर्गखोल्याही बंद असल्याने जाळ्या, धूळ साचली आहे.
शिक्षकांची उपस्थिती किती ?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरू नसल्या तरी शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
परंतु, पन्नास टक्के उपस्थितीच्या सूचना असल्या तरी काही शाळांत पन्नास टक्केही गुरुजी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे.
वर्गखोल्यांमधील धूळ हटेना
कोरोनामुळे शाळा बंद असून, वर्गखोल्याही कुलूपबंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खोल्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जाळ्या, धूळ साचल्याचे चित्र आहे.
काही लहान शाळांत मात्र उपस्थित शिक्षकांकडून शाळा व वर्गखोल्यांची स्वच्छता केली जात नसल्याचेही दिसून येते.
जबाबदारी कोणाची?
प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन केली जाते. या समितीच्या माध्यमातून शाळेची कामे, शाळेच्या सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते.
विद्यार्थ्यांविना शाळा बंद असल्याने बऱ्याच शाळेत अस्वच्छता आहे. यामुळे शाळा स्वच्छतेची नेमकी जबाबदारी कोणाची, हा मोठा प्रश्न आहे.