सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:54+5:302021-01-04T04:26:54+5:30
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कळंब येथील जुन्या बसस्थानकामधील शॉपिंग सेंटरमध्ये नगरपालिकेच्या जागेत शासकीय निधीतून ई-टायलेटचे बेसमेंट बांधण्यात आले ...

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कळंब येथील जुन्या बसस्थानकामधील शॉपिंग सेंटरमध्ये नगरपालिकेच्या जागेत शासकीय निधीतून ई-टायलेटचे बेसमेंट बांधण्यात आले होते. ते बेसमेंट २ जानेवारी रोजी एक्सकॅव्हेटर यंत्र एम.एच.- २५ सी.- ५३२५ चे चालक-मालक व अन्य व्यक्तींनी एक्सकॅव्हेटर यंत्राद्वारे उद्ध्वस्त करून सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान केले, अशी फिर्याद लक्ष्मीकांत वाघमारे यांनी कळंब ठाण्यात दिली. यावरून संबंधिताविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला. घटनेचा अधिक तपास कळंब पोलीस करीत आहेत.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई
उस्मानाबाद : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३१६ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून ७३ हजार ४०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
उस्मानाबादेतून दुचाकी पळविली
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर कोळी यांनी आपली दुचाकी एमएच- १३ बीएक्स- ६७७१ ही १ जानेवारी रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ उभी केली होती. ती त्यांना काही तासांनंतर उभ्या केलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी सापडत नसल्याने काेळी यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी गेल्याची फिर्याद दिली, यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
जुन्या भांडणावरून एकास लोखंडी गजाने मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणावरून एकास लोखंडी गजाने मारहाण झाली. ही घटना कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथे ३० डिसेंबर रोजी घडली.
बांगरवाडी येथील निवृत्ती चांगदेव बांगर हे गावातील एका किराणा दुकानासमोर थांबले होते. यावेळी गावातीलच बळीराम दत्तू बांगर याने तेथे येऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून निवृत्ती बांगर यांना लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून संबंधिताविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.