वीज बिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:50+5:302021-02-10T04:32:50+5:30
कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला होता. या काळात उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे अनेकांचा रोजगारही ...

वीज बिल माफीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला होता. या काळात उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे अनेकांचा रोजगारही हिरावला गेला. परिणामी, व्यापारी, शेतकरी, मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा स्थितीत वीज वितरण कंपनीने जनतेला भरमसाट वाढीव बिले दिली. या वाढीव बिलांच्या विरोधात आंदोलने झाली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वीजमंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिले कमी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आता वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल, अशा नोटिसा वीज कंपनीकडून ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. शासनाच्या या धोरणाविरोधात आंदोलन करावे लागत असल्याचे संंभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी आंदोलकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे; पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करण्यात यावेत, आदी मागण्या लावून धरल्या होत्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, आशिष पाटील, दत्तात्रय कवडे, आदित्य देशमुख, संजय लाकाळ, मनोज लोमटे, आकाश मुंडे, शिवदास पवार, बालाजी नाईकनवरे, कृष्णा जगताप, हनुमान हुंबे, दिनेश चौघुले, सुनील आडमुटे, आदींची उपस्थिती होती. या मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.