अनिधिकृतपणे देवस्थान जमिनीवरील पिकांचा विमा काढून भरपाई लाटली
By सूरज पाचपिंडे | Updated: July 14, 2023 19:39 IST2023-07-14T19:38:48+5:302023-07-14T19:39:15+5:30
शेतकरी विमा भरण्यासाठी गेल्यानंतर झाला भंडाफाेड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सीएससी सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अनिधिकृतपणे देवस्थान जमिनीवरील पिकांचा विमा काढून भरपाई लाटली
धाराशिव : बीड जिल्ह्यातील एका सीएससी केंद्र चालकाने चक्क धाराशिव तालुक्यातील सांजा येथील श्रीराम देवस्थानच्या जमिनीवरील पिके विमा संरक्षित करून भरपाई लाटल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. संबंधित शेतकरी विमा भरण्यास गेल्यानंतर या प्रकाराचा भंडाफाेड झाला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून संबंधित सीएससी सेंटर चालकाविरुद्ध आनंदनगर पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील सांजा येथे श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीची जमीन आहे. २०२३-२४ खरीप हंगामअंतर्गत या जमिनीवर अतिरिक्त पीक विमा भरणा केल्याचे शेतकरी विक्रम सूर्यवंशी व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात धाव घेऊन तक्रार दिली होती. कृषी विभागाने पडताळणी केली असता, श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या गट नंबर १९१ व १२४ मधील क्षेत्रावर प्रदीप चत्रभुज थोरात, तर गट नंबर २२९, ३४९ व ६१० मधील क्षेत्रावर संदीप चत्रभुज थोरात यांच्या नावे ६१३४२३३१००१० या क्रमांकाच्या सीएससी आयडीवरून भरण्यात आल्याचे समोर आले. प्रशासनाने या क्रमांकाचा ‘सीएससी’ आयडी कोणाच्या नावे नोंदणीकृत आहे, याची पडताळणी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या बीड जिल्हा व्यवस्थापकांकडे केली. त्यावर संबंधित आयडी केज तालुक्यातील बनकरंजा येथील संदीप चत्रभुज थोरात यांच्या नावे असल्याचे समाेर आले.
यानंतर संबंधित प्रकरणात संदीप चत्रभुज थोरात यास नोटीस बजावल्यानंतर त्याने नजरचुकीने चुकीचे कागदपत्र व गट नंबरची निवड करण्यात आल्याचा खुलासा केला होता. दरम्यान, संशय बळावल्याने प्रशासनाने पाठीमागील वर्षातील पडताळणी केली असता, खरीप-२०२२ मध्येही सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर गट नंबर ५३५, ६२७, ३४९ व ६२८ मधील क्षेत्रावर प्रदीप चत्रभुज थोरात याने संबंधित ‘सीएससी’ आयडीवरूनच विमा भरून १५ हजार २५५ रुपये विमा उचलल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी आनंदनगर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सामूहिक सेवा केंद्र चालक संदीप थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.