वाशी : शहरात वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सम-विषम पार्किंगचा नियम लागू केला आहे; परंतु यामुळे दुकानांसमोर वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार नरसिंग जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाशी शहरात नगरपंचायतीकडून सम-विषम तारखेला कुठल्या बाजूला वाहने लावावीत यासंबंधी काही ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. यामुळे रस्स्त्यावर कुठेही वाहने लावणाऱ्या नागरिकांना लगाम बसला आहे. शिवाय, रहदारीस होणारा अडथळाही काही प्रमाणात कमी झाला आहे; परंतु शहरातील रस्ते लहान असून, रस्त्याच्या बाजूला वाहने लावल्यानतंर रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे, तसेच सम-विषम पार्किंगच्या नियमामुळे व्यापऱ्यांच्या दुकानासमोर वाहनाची मोठी गर्दी होत आहे. याचा त्रास व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे सुरक्षित वाहन पार्किंगची सोय करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकट.......
अवजड वाहने बायपासकडे वळवा
शहरातील रस्ते लहान असून, त्यातच अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या समस्येत आणखी भर पडत आहे. त्यामुळे शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तांदूळवाडी बायपास रस्त्याची वळवावीत, अशी मागणी मनसेच्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष हर्षल उंदरे, शहराध्यक्ष नितीन बळवंतराव जाधव, सचिव प्रवीण कवडे, सुजित हवलदार, लहूजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष मारुती क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, लखन शिंदे यांच्या सह्या आहेत.